रत्नागिरी जिल्ह्यात अपंगांसाठीची योजनाच पंगू
By Admin | Updated: August 1, 2014 23:26 IST2014-08-01T22:52:19+5:302014-08-01T23:26:51+5:30
निधीचा पुरवठा अपुरा : मदत मागण्यासाठी येणाऱ्यांनाच लाभ

रत्नागिरी जिल्ह्यात अपंगांसाठीची योजनाच पंगू
रहिम दलाल -रत्नागिरी , जिल्ह्यात अपंगांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांसाठी अपुऱ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अपंग स्वत:हून शासन दरबारी येत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ दिला जात नाही. जिल्ह्यात ३७२५ अपंगांची नोंद असली तरी गतवर्षी केवळ १९ अपंगांनाच आर्थिक मदत देण्यात आली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अपंग प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत़ अल्पदृष्टी, पूर्णत: अंध, कर्णबधिर, वाचादोष, अस्थिव्यंग, मतिमंद, बहुविकलांग, सेरेबल पालसी असे अपंगांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. शालेय स्तरावर तपासणी करुन त्यांची नोंद करण्यात येते. अपंगांच्या स्वावलंबनासाठीही शासनास्तरावर योजना असल्या तरी त्या त्यांच्यापर्यंत पोचवत नाहीत. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून अपंगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये बहिरे व मुके यांच्यासाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना आर्थिक सहाय्य, मनोविकलांगासाठी अशासकीय संस्थांना सहाय्य, शारीरिकदृ्ष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आठवीपर्यंतच्या शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व उद्योगांतर्गत प्रशिक्षण, लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य अशा विविध योजनांसाठी २ कोटी ४१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मार्चअखेर ही संपूर्ण रक्कम लाभार्थींवर खर्च करण्यात आली होती. मात्र, या तरतूदीमध्ये गतवर्षीपेक्षा केवळ १४ लाख रुपयांची वाढ करुन सन २०१४-१५ साठी २ कोटी ५५ लाख ३१ हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अपंग सेवा केंद्रामध्ये आतापर्यंत २८४० अपंगांची नोंद करण्यात आली आहे. त्यांना अपंगत्त्वाचे ओळखपत्रही देण्यात आले आहे. लघुउद्योगासाठी शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय्य या योजनेअंतर्गत ५ लाख १० हजार रुपये एवढ्या कमी प्रमाणात तरतूद करण्यात आली होती. या योजनेमध्ये केवळ १९ अपंगांना लाभ देऊन त्यांच्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी छोट्या व्यवसायाला आर्थिक मदत करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात त्यामध्ये ९० हजार रुपयांची वाढ करुन ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अपंगांची मोठ्या प्रमाणात संख्या असताना केवळ ६ लाख रुपयांची तुटपुंजी तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये ५३१९ अपंग विद्यार्थी असून, वर्गवारीनुसार त्यांची संख्या
वर्गवारी अपंग
अल्पदृष्टी
१३८७
पूर्णत: अंध ६६
कर्णबधिर ६०२
वाचादोष ३६५
अस्थिव्यंग ६७३
मतिमंद१९३२
बहुविकलांग २१३
सेरेबल पाल्सी ९
एकूण ५३१९
अपंग केंद्रात ३७२५ अपंगांची नोंद.
गतवर्षी लघुउद्योगासाठी केवळ १९ अपंगांना आर्थिक सहाय्य.
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून अपंग असल्याचा दाखला दिल्यानंतर त्यांची अपंग केंद्रामध्ये नोंद करण्यात येते. त्याचा फायदा एस. टी., रेल्वेमध्ये अल्पदरात प्रवासासाठी शिवाय इतर योजनांचा लाभ मिळविण्यासाठी होतो.
शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व उद्योगातील प्रशिक्षण या योजनेसाठी सन २०१३-१४ मध्ये ५ लाख रुपयांची तरतूद होती. मात्र, चालू आर्थिक वर्षाची तरतूद करताना त्यामध्ये २ लाख रुपयांची घट करण्यात आल्याने आता ही तरतूद ३ लाख रुपयांवर आली आहे. गतवर्षी या योजनेचा लाभ ६७ विद्यार्थ्यांनी घेतला असून, संपूर्ण रक्कम खर्च झाली होती.