मच्छीच्या जाळीत अडकलेल्या माकडाच्या पिलाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:31+5:302021-03-22T04:28:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : अन्न-पाण्याच्या शोधात आईसोबत आलेले माकडाचे पिलू घराच्या छतावर लावलेल्या जाळीत अडकले आणि त्याची सुटण्यासाठी ...

मच्छीच्या जाळीत अडकलेल्या माकडाच्या पिलाला जीवदान
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : अन्न-पाण्याच्या शोधात आईसोबत आलेले माकडाचे पिलू घराच्या छतावर लावलेल्या जाळीत अडकले आणि त्याची सुटण्यासाठी धडपड सुरू झाली. प्राणीमित्रांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या पिलाला जीवदान मिळाल्याची घटना दापाेली तालुक्यातील आडे येथे घडली.
परसबाग किंवा घराच्या छतावर प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी अनेक वेळा मासेमारीसाठी वापरण्यात येणारी जाळी लावली जाते. सुरक्षा म्हणून लावण्यात आलेल्या जुनाट मच्छीच्या जाळीमध्ये अनेक वेळा कबुतरे, तर काही वेळा माकडे, श्वानांची पिले व जंगली श्वापदे अडकण्याच्या घटना घडतात. दापाेली तालुक्यातील आडे येथील निकेतन नांदगावकर यांच्या घराच्या गच्चीवर अशीच जाळी लावण्यात आली हाेती. घराच्या छपरावरून आपल्या आईसाेबत जात असताना माकडाचे पिलू जाळीत अडकले. माकडाची आई तेथून सहीसलामत बाहेर पडली, पण त्या पिलाला बाहेर पडता आले नाही. याबाबत निकेतन नांदगावकर यांनी प्राणीमित्र माेनित बाईत यांना माहिती दिली. त्यांनी तेथे येऊन त्या पिलाची त्या जाळीतून सुटका केली. पिलाची जाळीतून सुखरूपपणे सुटका करून, त्याची त्याच्या आईशी गाठ घालून दिली. जाळ्यातून सुटका होताच त्याची आई पिलाजवळ आली आणि त्याला उचलून घेऊन पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात निघून गेली.
प्राणी वन्यजीव रक्षक मोनित बाईत या तरुणाने जाळीत अडकलेल्या माकडाच्या पिलाला जीवदान दिले. यापूर्वी या तरुणाने जाळीत अडकलेल्या अजगराला सुखरूप सोडविले होते. तसेच परिसरात जाळीमध्ये अडकलेल्या अनेक मुक्या प्राण्यांची त्यांनी सुटका केली आहे. त्यामुळे वन्यजीव रक्षक म्हणून त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एखादा प्राणी संकटात असल्याचा त्यांना फोन जाताच तत्काळ ते घटनास्थळी धावून जातात.
काेट
या भागात अनेकवेळा जाळ्यांमध्ये वन्यप्राणी अडकण्याचे प्रकार घडत आहेत. यापूर्वी जाळीत अडकलेल्या एका अजगरालाही जीवदान दिले आहे. सुरक्षेसाठी लावण्यात येणारी जाळी अन्य प्राण्यांच्या जिवावर बेतत आहे. अनेकवेळा वन्यप्राण्यांचा जीवही जाताे. त्यामुळे संरक्षणासाठी जाळ्यांऐवजी अन्य साहित्याचा वापर हाेणे गरजेचे आहे. जेणे करून वन्यप्राण्यांचे जीव वाचण्यास मदत हाेईल.
- मोनित बाईत, प्राणीमित्र