सावरकर साहित्य संमेलन २९पासून

By Admin | Updated: December 24, 2015 23:53 IST2015-12-24T23:18:30+5:302015-12-24T23:53:01+5:30

दीपक पटवर्धन : रत्नागिरीतील कार्य प्रभावीपणे जनतेसमोर येण्यासाठी प्रयत्न

Savarkar Sahitya Sammelan 29 | सावरकर साहित्य संमेलन २९पासून

सावरकर साहित्य संमेलन २९पासून

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार परत अधोरेखित होऊन समाजासमोर यावेत, विशेषत: युवा पिढीवर त्याची मोहिनी पडावी, रत्नागिरीत त्यांनी केलेले कार्य प्रभावीपणे जनतेसमोर यावे, या उद्देशाने रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने पुढाकार घेतला आहे. येत्या २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत २८ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन रत्नागिरीत होणार असल्याची माहिती नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली.
हे साहित्य संमेलन मुंबईतील स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान तसेच जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. गतवर्षी हे साहित्य संमेलन हैद्राबाद येथे तर त्याआधी नाशिक येथे झाले होते. रत्नागिरीतील होणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. २९ रोजी सायंकाळी ४ वाजता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन भिकू (दादा) इदाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संमेलनापूर्वी सकाळी आयोजित केलेली ग्रंथदिंडी वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे.
यात समाजातील सर्व घटकांचा, संघटनांचा सहभाग अपेक्षित आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत विविध सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक आदी विविध विषय हाताळले जाणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकाही प्रसिद्ध होणार आहे. विविध संस्था, सामाजिक काम करणारे घटक यांना बरोबर घेऊन दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रमुख उ्ददेश या संमेलनामागे असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
हे तीन दिवसीय साहित्य संमेलन नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. दि. ३० व ३१ जानेवारी या दोन दिवसांच्या कालावधीत सावरकरांच्या विचार आणि कार्यावर आधारित अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये अ‍ॅड. किशोर जावळे, डॉ. श्रीरंग गोडबोले, धनश्री लेले, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. अशोक मोडक, व्ही. एम. पाटील, प्रा. रमेश सोनवडकर, सच्चिदानंद शेवडे, प्रा. दत्ता नाईक, दुर्गेश परूळेकर, समीर दरेकर, अश्विनी मयेकर आदी मान्यवरांचा सहभाग असणार आहे. दि. ३० रोजी रात्री सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा अतिशय दर्जेदार असा गाजलेला ‘अनादी मी...अवध्य मी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि. ३१ रोजी दुपारी १२.३० वाजता संमेलनाची सांगता प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरीत येणाऱ्या महाराष्ट्रातील सावरकरप्रेमींची संख्या लक्षात घेऊन रत्नागिरीतील विविध स्थळे आणि सावरकरांचे वास्तव्य असलेल्या वास्तू पाहण्याच्या दृष्टीने वेगळे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही अ‍ॅड. पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासमवेत चंद्रशेखर पटवर्धन उपस्थित होते. (प्रतिनिधी)


संमेलनादरम्यान सिंधुदुर्गचे साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘कवी, नाटककार सावरकर’ या पुस्तकाचेही प्रकाशन होणार असल्याचे दीपक पटवर्धन यांनी सांगितले.


स्वातंत्र्यवीरांच्या जीवनपटाबरोबरच विविध विषयांचा ऊहापोह.
२९ रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन.
तीन दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांची रेलचेल.

Web Title: Savarkar Sahitya Sammelan 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.