Satara Bus Accident : तुळसणीच्या सुपुत्रावर मायभूमीत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 17:17 IST2018-07-30T17:15:37+5:302018-07-30T17:17:43+5:30
पोलादपूरनजीक खासगी बस दरीत कोसळून शनिवारी झालेल्या भीषण अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील हेमंत बापूराव सुर्वे यांचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी ९ वाजता हेमंत सुर्वे यांचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर दुपारी तुळसणी येथील निवासस्थानी आणण्यात आला. येथीलच स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात सुर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Satara Bus Accident : तुळसणीच्या सुपुत्रावर मायभूमीत अंत्यसंस्कार
देवरूख : पोलादपूरनजीक खासगी बस दरीत कोसळून शनिवारी झालेल्या भीषण अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील हेमंत बापूराव सुर्वे यांचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी ९ वाजता हेमंत सुर्वे यांचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर दुपारी तुळसणी येथील निवासस्थानी आणण्यात आला. येथीलच स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात सुर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातातील मृतांमध्ये तुळसणी (ता. संगमेश्वर) येथील हेमंत सुर्वे यांचा समावेश आहे. सुर्वे यांचा मृतदेह रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मृतदेह हाती लागला. मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तुळसणी येथील निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी सुर्वे कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
दरम्यान, सायंकाळी ४ वाजता येथीलच स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेमध्ये शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्य रोहन बने यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी, तुळसणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच सुर्वे यांची मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.
सामाजिक योगदानही...
हेमंत सुर्वे यांना सामाजिक कार्याची आवड होती. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याकरिता ग्रामविकास समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचे हेमंत सुर्वे हे अध्यक्ष होते. गावात सलोखा कायम राहावा, यासाठी सुर्वे यांनी गावची निवडणूक बिनविरोध होण्याकरिता सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन ग्रामपंचायत निवडणूक सुर्वे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने बिनविरोध केली.
ग्रुपवर अखेरचा मेसेज
सोशल मीडियाच्या माध्यमातून आता विविध व्हॉट्सअॅप ग्रुप कार्यरत आहेत. हेमंत सुर्वे यांचा महाविद्यालयीन बॅचचा ग्रुपदेखील आहे. या ग्रुपमध्ये शनिवारी सकाळी हेमंत यांनी टाकलेला गुड मॉर्निंगचा मेसेज अखेरचा ठरल्याचे ग्रुपमधील सदस्यांनी भावनाविवश होताना सांगितले.
मुलीच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरे
हेमंत सुर्वे यांना एकुलती एक मुलगी आहे. तिला उच्च पदस्थ अधिकारी करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. त्यादृष्टीने त्यांनी पुढील पावलेही उचलली होती. मात्र, सुर्वे यांची ही इच्छा त्यांच्या मनातच राहिली आहे.
माझी वाट पाहू नका
शनिवारपाठोपाठ रविवारी सुट्टी असल्याने हेमंत सुर्वे हे तुळसणी येथे येणार होते. मात्र, कर्मचारीवर्गाने महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केला. यात सुर्वेदेखील सहभागी झाले. त्यांनी आपल्या कुटुंबियांना माझी वाट पाहू नका, असे भ्रमणध्वनीवरून सांगितले.