Sanjay Kadam, Vaibhav Khedekar arrested | संजय कदम, वैभव खेडेकर यांना खेड पोलिसांकडून अटक
संजय कदम, वैभव खेडेकर यांना खेड पोलिसांकडून अटक

ठळक मुद्देकारवाई-- विधानसभा निवडणुकीत मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने सहाजणांना आधीच अटक- विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर घडला होता प्रकार- खेडातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार

खेड : विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मनाई आदेशाचे उल्लंघन करून माजी आमदार संजय कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बेकायदेशीर रॅली काढल्याप्रकरणी खेड पोलिसांनी संजय कदम व वैभव खेडेकर यांच्यासह १७ कार्यकर्त्यांना मंगळवारी अटक केली. याप्रकरणी सहाजणांना २२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.

याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले की, दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तालुक्यात गस्त सुरू होती. त्याचदरम्याने सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम व वैभव खेडेकर हे २०० ते २५० जणांसोबत दुचाकीवरून कर्णकर्कश हॉर्न वाजवत व ओरडत दापोलीकडून भरणे नाका येथे गेले. त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यांना जिल्हा दंडाधिकारी यांचा मनाई आदेश लागू असल्याचे माहिती असतानाही त्यांनी आदेशाचे उल्लंघन केले. यावेळी त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भरणेनाका येथे रात्री ८.३० वाजता मी व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की काळकाई मंदिरात रॅलीचा पाठलाग करत गेलो. त्यावेळी रॅली न काढण्याची विनंती केल्याचे पाटील यांनी सांगितले.

या घटनेनंतर आम्ही संजय वसंत कदम यासह सायली कदम (रा. चिंचघर - प्रभुवाडी), वैभव खेडेकर (रा. भडगाव), अजय पिंपरे (रा. सुसेरी), तौसिफ सांगले (रा. चिंचघर - प्रभुवाडी), प्रमोद जाधव, धीरज कदम, ओंकार कदम, पंकज जाधव, कौशल चिखले, मिलिंद नांदगावकर, संतोष पवार, स. तु. कदम, सुनील चव्हाण, साहिल कदम, प्रसाद कदम, विनोद तांबे, गोदकर, विजय जाधव, सुरेश मोरे, राहुल कोकाटे, बाबा मुदतसर, प्रकाश शिगवण, बाबू नांदगवकर, सतीश कदम, सचिन जाधव, इम्तियाज खतीब, प्रदोश सावंत, चेतन धामणकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १४३, १४७, १४९, २६८, २९०, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१चे कलम १२६सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

त्यापैकी अजय पिंपरे, तौसिफ सांगले, प्रमोद जाधव, धीरज कदम, ओमकार कदम, पंकज जाधव या सहाजणांना दि. २२ ऑक्टोबर रोजी अटक केली होती, तर दि. १९ नोव्हेंबर रोजी संजय कदम, सायली कदम, वैभव खेडेकर, साहिल कदम, प्रसाद कदम, विनोद तांबे, ओंकार गोंदकर, विजय जाधव, राहुल कोकाटे, प्रकाश शिगवण, सचिन जाधव, प्रदोष सावंत, चेतन धामणकर, कौशल चिखले, मिलिंद नांदगावकर, संतोष पवार, सुनील चव्हाण आदी एकूण सतरा आरोपींना अटक करण्यात आली  आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.

शाब्दिक चकमक
काळकाई मंदिर येथे पोलिसांनी पाठलाग करून रॅली काढू नका, असे सांगितले. त्यानंतर माजी आमदार  संजय कदम आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतरही संजय कदम यांनी रॅली सुरूच ठेवली होती.

Web Title: Sanjay Kadam, Vaibhav Khedekar arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.