वडाची साल पिपलाक लाव, अनी साहित्याची गोडी लाव रे म्हाराजा!; संगमेश्वरी बोलीतील साहित्यिक गुढीला घालण्यात आले गाऱ्हाणे

By अरुण आडिवरेकर | Updated: March 23, 2023 17:42 IST2023-03-23T17:42:19+5:302023-03-23T17:42:42+5:30

रत्नागिरी : ‘बा साहित्यपुरषां म्हाराजा, उबा र्‍हा.. आज व्हया टिकानी साहित्याची गुढी उबारलीली हाय.. साहित्याचा तोरानं बांदलीला हाय.. पुस्तकांची ...

Sangameshwari Dialect Literary Gudi Garhane | वडाची साल पिपलाक लाव, अनी साहित्याची गोडी लाव रे म्हाराजा!; संगमेश्वरी बोलीतील साहित्यिक गुढीला घालण्यात आले गाऱ्हाणे

वडाची साल पिपलाक लाव, अनी साहित्याची गोडी लाव रे म्हाराजा!; संगमेश्वरी बोलीतील साहित्यिक गुढीला घालण्यात आले गाऱ्हाणे

रत्नागिरी : ‘बा साहित्यपुरषां म्हाराजा, उबा र्‍हा.. आज व्हया टिकानी साहित्याची गुढी उबारलीली हाय.. साहित्याचा तोरानं बांदलीला हाय.. पुस्तकांची पुंजा केलीली हाय.. ती मान्य करून घे. वाचनान्याला ढिगभर पुस्तकाचा वाचयाची वांशा देस.. लिवनार्‍यांच्या हातात ताकत देस.. बोलनार्‍याच्या त्वांडार सरस्वती नाचनं दे.. असा सगला बरा करून वडाची साल पिपलाक लाव.. उलट्याचा सरल कर.. अनी साहित्याची, वाचनाची गोडी लाव रे म्हाराजा..!’ असे संगमेश्वरी बोलीतील खणखणीत गाऱ्हाणे साहित्यिक गुढीला घालण्यात आले.

जनसेवा ग्रंथालयातर्फे वाचन चळवळ आणि साहित्य चळवळ वाढीस लागावी, समृध्द व्हावी या हेतूने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ग्रंथालयाच्या प्रांगणात साहित्यिक गुढी उभारण्यात आली होती. यावेळी हे गाऱ्हाणे घालण्यात आले. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्या हस्ते साहित्यिक गुढीचे पूजन आणि ग्रंथपूजन करण्यात आले.

यावेळी जनसेवाचे अमोल पालये यांनी साहित्यिक गुढी उभारण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. ही गुढी रत्नागिरीची साहित्य, वाचन चळवळ वाढीस लागावी यासाठी उभारली आहे. या गुढीची काठी ही लेखणीची प्रतीक आहे आणि या गुढीचा गढू हा विचारांचा प्रतीक आहे. लेखणीतून चांगले साहित्य, चांगले विचार प्रसवावेत, ही या गुढीची संकल्पना आहे, असे अमाले पालये यांनी सांगितले.

रत्नागिरीतील चित्रकार आणि जनसेवाचे वाचक श्रीनिवास सरपोतदार यांनी नेहमीप्रमाणे साहित्यिक गुढीचे आकर्षण ठरणाऱ्या साहित्य पताका यावर्षीही साकारल्या होत्या. यावर्षी पताकांवर नामवंत साहित्यिकांची नावे आणि त्यांची सुबक चित्रे त्यांनी स्वत: रेखाटली होती.
यावेळी ग्रंथालयात लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी आणि उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेविका श्रध्दा कळंबटे, जनसेवाचे सु. द. भडभडे, चित्रकार श्रीनिवास सरपोतदार, मधुसुदन नानिवडेकर, आभा घाणेकर, ग्रंथपाल सिनकर, सुजाता कोळंबेकर, मेघा कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Sangameshwari Dialect Literary Gudi Garhane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.