दापोली : दापोली आगारातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण दापोली आगारातच करण्याची मागणी तालुक्यातील जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य चारूता कामतेकर, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांना पत्र दिले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली आगारात सद्यस्थितीत ३९३ कर्मचारी कार्यरत आहेत, यापैकी १९७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले. मात्र, उर्वरित १९७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही. यापूर्वी टप्प्याटप्प्याने ५०च्या गटाप्रमाणे लसीकरण केले गेले. परंतु, त्यावेळीही अनेक कर्मचाऱ्यांना दिवसभर ताटकळत राहावे लागले. काहींचा नंबरच लागला नाही, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तसेच आता टप्प्याटप्प्याने बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशावेळी केंद्रावर जाऊन लस घेणे कर्मचाऱ्यांना शक्य नाही. दुर्दैवाने सेवा बजावताना एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास त्रास त्याच्या कुटुंबीयांसह इतर कर्मचाऱ्यांनाही भोगावा लागेल. लस घेतल्यावर लागण झालीच तरी त्रास कमी होतो, असे सांगितले जाते. एस. टी. कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर्समध्ये येत असल्याने जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाने दापोली आगारातच टप्प्याटप्प्याने लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.