फळे, भाज्यांना वाढती मागणी, दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:12+5:302021-09-13T04:30:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असल्याने फळे, भाज्यांना वाढती मागणी असून, दरात मात्र वाढ झाली आहे. गावठी ...

फळे, भाज्यांना वाढती मागणी, दरात वाढ
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गणेशोत्सव सुरू असल्याने फळे, भाज्यांना वाढती मागणी असून, दरात मात्र वाढ झाली आहे. गावठी भाज्या बाजारात उपलब्ध असून फळे, भाज्याविक्रेते गावोगावी, गल्लोगल्ली फिरत आहेत.
उत्सवामुळे घरे माणसांनी गजबजली असून, पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. साहजिकच माणसांचा राबता वाढल्याने भाजीपाल्याचा खपही वाढला आहे. बाजारात विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध असून, गावठी भाज्याही विक्रीसाठी आल्या आहेत. काकडी, चिबूडसह दोडकी, भेंडी, गवार, पडवळ, घेवडा, कोबी, फ्लाॅवर, फरसबी, वांगी, सिमला मिरची, गाजर यांना मागणी आहे. मूळा, माठ, मेथी, शेपू, पालक आदी पालेभाज्यांची उपलब्धता होत आहे. १५ ते २० रुपये दराने पालेभाज्यांची विक्री सुरू आहे.
उत्सवकाळात फळांनाही वाढती मागणी आहे. सफरचंद, केळी, चिकू, पेरू, नासपती, माेसंबी, संत्री, डाळिंब, सीताफळ पपई विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोशिंबिरीच्या काकडीसह वड्यासाठी लागणाऱ्या मोठ्या काकड्यांचा खप अधिक आहे.
दरात वाढ तरीही खरेदी
ऐन उत्सव काळात भाज्यांचे दरात वाढ झाली आहे. मात्र दरावर भाज्यांची उपलब्धता होत असल्याने दरामध्ये फारशी घासघीस न करता खरेदी करण्यात येत आहे. शहरातील नाक्यानाक्यावर तसेच गावातून भाजी व फळेविक्रेते फिरत असल्याने उपलब्धता सहज होत आहे. त्यामुळे दराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सीताफळांना मागणी
शंभर रुपयांना दीड किलो दराने सीताफळ विक्री सुरू आहे. सीताफळाचा हंगाम सुरू असल्याने कच्ची, तयार सीताफळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. किरकोळ विक्री मात्र ६० ते ७० रुपये किलो दराने सुरू आहे.
कणसांचा खप
मक्याची कोवळी कणसे विक्रीसाठी उपलब्ध असून, १० ते १५ रुपये नग दराने विक्री सुरू आहे. गाडीवर मात्र ४० रुपयांना तीनप्रमाणे विक्री सुरू आहे. भाज्यांसह कणसांची खरेदी ग्राहक प्राधान्यांने करीत आहेत. कणसासह दाणेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सणासुदीच्या काळात भाज्यांचा खप अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे. नैवेद्यामुळे भाज्यांना वाढती मागणी आहे. ऐनवेळी होणारी उपलब्धता यासाठी विक्रेते सांगतील ती किंमत मोजावी लागत आहे. शहरातील काही माॅलमध्ये भाज्यांची विक्री करण्यात येत आहे. परंतु माॅलमधील दर व प्रत्यक्ष बाजारातील दर यामध्ये कमालीचा फरक आहे. यामध्ये ग्राहकांची फरफट होत आहे.
- सोनाली कांबळे, रत्नागिरी
एकाच शहरात भाज्या असो वा फळे प्रत्येक ठिकाणचे दर वेगवेगळे आहे. अंतरात फरक असला तरी दरात फरक कशासाठी? बहुतांश भाज्या परजिल्ह्यातून येतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव झालेनंतर भाज्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. लिलावावेळचे दर व प्रत्यक्ष विक्री दरात कमालीचा फरक आहे. त्यातच प्रत्येक ठिकाणचा दर वेगळा लावला जात आहे.
- प्रणाली जोयशी, रत्नागिरी