राजापुरात मृतांच्या संख्येतील वाढ चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST2021-04-30T04:39:55+5:302021-04-30T04:39:55+5:30
राजापूर : राजापूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील दोन दिवसांमध्ये तब्बल ८३ रुग्णांची भर पडली आहे. वाढत्या ...

राजापुरात मृतांच्या संख्येतील वाढ चिंताजनक
राजापूर : राजापूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील दोन दिवसांमध्ये तब्बल ८३ रुग्णांची भर पडली आहे. वाढत्या संख्येबरोबरच बाधितांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
राजापूर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असून, सद्यस्थितीत कोरोनाचा आकडा हजाराच्या दिशेने सरकत आहे. तालुक्यात आजपर्यंत ९२७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये ४७६ रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून, ४१२ रुग्ण उपचार घेत आहेत. ३९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांपैकी ३०० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रायपाटण कोविड सेंटरमध्ये ५४ रुग्ण दाखल आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ३० असून, जिल्ह्याबाहेरील खासगी रुग्णालयात १७ तर तालुक्याबाहेर ११ जण उपचार घेत आहेत.
तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असताना कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात राजापूर व रायपाटण अशी दोन ग्रामीण रुग्णालये असून, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. आजपर्यंत सर्वांत जास्त रुग्ण व सर्वात जास्त मृत्यू करक प्राथमिक रुग्णालयांतर्गत निष्पन्न झाले आहेत. कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे. तालुक्यात २३६ गावे असून, यापैकी ८१ गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. उर्वरित गावांनी अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळविले आहे.