रिक्षा - ट्रक अपघातात पितापुत्राचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 00:32 IST2019-11-16T00:32:32+5:302019-11-16T00:32:42+5:30
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव येथे रिक्षा ट्रकवर आदळून रिक्षातील पितापुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली.

रिक्षा - ट्रक अपघातात पितापुत्राचा मृत्यू
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव येथे रिक्षा ट्रकवर आदळून रिक्षातील पितापुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली. संतोष जानू बावदाने आणि श्रेयस संतोष बावदाने (१३) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. यात रिक्षा चालक संजय धोंडू आखाडे गंभीर जखमी झाला आहे. कुवारबावकडून मिरजोळेकडे जाण्यासाठी वळलेल्या ट्रकवर रिक्षा आदळून हा अपघात झाला.
कोल्हापूर येथून मिरजोळे एमआयडीसी येथे जाणारा ट्रक क्रमांक एम एच ०९ सी यू ८०४४ हा कंचन हॉटेल चौकातून एमआयडीसीकडे वळत होता. त्याला रेल्वे स्थानकाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाने मागून धडक दिली. या भीषण धडकेत रिक्षातील तेरा वर्षीय श्रेयस बावदाने व त्याचे वडील संतोष जागीच ठार झाले. या दोघांसह रिक्षामध्ये अडकलेल्या चालकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु संतोष आणि श्रेयस या दोघांचीही प्राणज्योत मालवली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनिल लाड हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.