समाज, धर्माचार्य एकत्र आल्यास क्रांती
By Admin | Updated: October 15, 2016 23:16 IST2016-10-15T23:16:51+5:302016-10-15T23:16:51+5:30
देवेंद्र फडणवीस : नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव सुरू; ५६ हजारांवर लोकांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प

समाज, धर्माचार्य एकत्र आल्यास क्रांती
रत्नागिरी : जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत ५६ हजारांपेक्षा अधिक लोक मरणोत्तर देहदानाला तयार होतात, ही साधी गोष्ट नाही. हा महान त्याग असून, यापेक्षा मोठा चमत्कार असूच शकत नाही. जेव्हा समाज आणि धर्माचार्य अशा कामामध्ये उभे राहतात तेव्हा मोठी क्रांती होते, असे उदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या
५० व्या जन्मोत्सवानिमित्त तालुक्यातील नाणीजधाम येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विनायक राऊत, खासदार नानाभाऊ पटोले, आमदार उदय सामंत, राजन साळवी, संजय कदम व सदानंद चव्हाण, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार विनय नातू, सूर्यकांत दळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर उपस्थित होते.
उपस्थितांच्या स्वागतानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानाने गेल्या अनेक वर्षांत राज्यात व राज्याबाहेर केलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांबाबत माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. तब्बल ५६ हजारांहून अधिक लोकांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संकल्प केल्यानंतर दिवंगत झालेल्या तीन लोकांचे देहदान करण्यातही आले आहे. या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांचा मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या संस्थानने गेल्या काही वर्षात अनेक समाजोपयोगी कामे करून समाजाशी बांधिलकी जपली आहे. समाजाची व देशाची सेवा करण्याचा जो संकल्प नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे त्यानुसार या संस्थानकडून भविष्यातही अनेक चांगली कामे पूर्ण होतील. माणूस जिवंतपणी आपल्यासाठी जगतो. मरणानंतरही दुसऱ्याला काही देत नाही. प, या संकल्पामुळे मरणानंतरही आपला देह दुसऱ्याच्या उपयोगी आणता येतो. दरवर्षी पाच लाख अवयवांची गरज असते. त्यासाठी आवाहन करूनही गतवर्षी देहदानाचे प्रमाण केवळ .००८ टक्के एवढे होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील हा देहदान उपक्रम देशातच नव्हे तर जगातील सर्वात मोठा उपक्रम असावा, असेही फडणवीस म्हणाले.
रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले की, संस्थानची सामाजिक उपक्रमांची चित्रफीत पाहिल्यानंतर संस्थानचे कार्य अधोरेखित झाले. ३ लाख लोकांना व्यसनमुक्त केले. हजारो लोकांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश दिला. त्यामुळे असे उपक्रम राबविणारे व रंजल्या गांजलेल्यांना मदतीचा हात देणारे हे संस्थान प्रशंसेला पात्र आहे. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, नरेंद्राचार्यजी महाराजांच्या संस्थानाने राबविलेला देहदान, रक्तदान उपक्रम कौतुकास्पद आहे. विविध सामाजिक गरजा भागविण्याचे त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. ज्यावेळी भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केल्याच्या दुसऱ्या दिवशी देशात दिवाळी साजरी झाली. लोकांमध्ये ही ऊर्जा आली कोठून? नरेंद्राचार्यजी महाराजांनी देहदानाचे आवाहन केल्यानंतरही त्याला भरभरून प्रतिसाद देणाऱ्यांमध्येही अशीच ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळेच ५६ हजारांवर लोकांनी देहदानाची तयारी दर्शवली.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, आपला देश हा ऋषीप्रधान आहे तसाच कृषीप्रधान आहे. नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थानाने गेल्या काही वर्षात समाजातील सर्वच क्षेत्रात चांगले काम केले आहे. शेतकऱ्यांना अवजारांचे वाटपही केले आहे. शिक्षण क्षेत्रातही संस्थेचे योगदान आहे. हे समाजकार्य यापुढेही सुरू राहावे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
धर्मसत्तेनेच सावरले : जेव्हा जेव्हा राजसत्ता भ्रष्ट झाली, तेव्हा तेव्हा धर्मसत्तेनेच त्यांना मार्गावर आणले आहे. धर्मसत्तेमुळेच सुसंस्कारित समाज घडला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे ईश्वरीय कार्य...
जगद्गुरू नरेंद्राचार्य अर्थात धर्माचार्य यांच्या माध्यमातून चांगला समाज घडतो आहे. कोणताही जातीभेद न ठेवता आपण जगायचे आणि इतरांनाही जगवायचे हे ईश्वरीय कार्य आहे. महाराज समाजात बंधूभाव निर्माण करीत आहेत, हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.