शिमगाेत्सवावरील निर्बंध शिथिल करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:57+5:302021-03-23T04:33:57+5:30
राजापूर प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना रवींद्र नागरेकर, अभिजित गुरव यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. लाेकमत न्यूज ...

शिमगाेत्सवावरील निर्बंध शिथिल करावेत
राजापूर प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना रवींद्र नागरेकर, अभिजित गुरव यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिमगोत्सव साजरा करण्याबाबत घालण्यात आलेले जाचक निर्बंध शिथिल करून शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी परवानगी दिली जावी, अशी मागणी राजापूर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे प्रांताधिकारी राजापूर यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्याकडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर व तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिले आहे.
शिमगोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. प्रत्येक गावात वाडीवस्तीवर हा सण साजरा होत असतो. होळी, पालखी सोहळा, खेळे, रगपंचमी, गोमू, निशाण खेळे अशा विविध अविष्कारांत हा उत्सव कोकणी माणूस साजरा करत असतो. गत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र झाला आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राजापूर तालुक्यात ग्रामदक्षता कमिटी, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून त्याचा यशस्वी सामना केलेला आहे. त्यामुळे त्याचा तालुक्यात फार मोठा प्रादुर्भाव झालेला नाही. ही गोष्ट नाकारता येणार नाही. त्यामुळे आगामी शिमगोत्सवातही त्यात्या गावांवर जबाबदारी सोपविल्यास गर्दीचे नियोजन करून कोणत्याही प्रकारे संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, याची खबरदारी घेतली जाईल. त्यामुळे शासनाने याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच शासनाने हा उत्सव साजरा करत असताना सरसकट काही नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये ज्या गावात हा उत्सव साजरा होणार आहे, त्या गावातील २५ लोकांनी कोरोना चाचणी करावी. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच उत्सव साजरा करावा. पालखी घरोघरी नेण्यात येऊ नये. खेळे नाचू नयेत, असे काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, आठवडाबाजार, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणची गर्दी हे सारे सुरू आहे. मग, शिमगाेत्सवावरच बंधन का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, नगरसेवक गोविंद चव्हाण, अरविंद लांजेकर, शीतल पटेल, सोनम केळकर, प्रशांत जाधव, प्रमोद मांडवकर उपस्थित होते.