CoronaVirus Positive News सकारात्मक माहिती : रत्नागिरी जिल्ह्यातील १३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 13:46 IST2020-05-06T13:44:10+5:302020-05-06T13:46:46+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन केले पाहिजे. अनावश्यक असणारी गर्दी टाळणे, घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे. कोरोना रूग्णांची संख्या अधिक झाल्यास जिल्हा रेडझोनमध्ये जाण्याची भीती आहे.

CoronaVirus Positive News सकारात्मक माहिती : रत्नागिरी जिल्ह्यातील १३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीव जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालापैकी १३३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालांमध्ये मंगळवारी रात्री आलेले ४८ तर बुधवारी सकाळी आलेल्या ८५ अहवालांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, १५ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या वाढत असून, जिल्हा रेडझोनमध्ये जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात येत आहेत.
मिरज येथे पाठविलेल्या काही अहवालांपैकी मंगळवारी रात्री ४७ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये मंडणगडमधील २७, कामथेमधील ११ व गुहागरमधील ९ अहवालांचा समावेश आहे. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बुधवारी सकाळी आणखीन ८५ अहवाल प्राप्त झाले असून, त्यात कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील ७५, कामथे उपजिल्हा रूग्णालयातील १० अहवालांचा समावेश आहे. हे अहवालदेखील निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन केले पाहिजे. अनावश्यक असणारी गर्दी टाळणे, घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे. कोरोना रूग्णांची संख्या अधिक झाल्यास जिल्हा रेडझोनमध्ये जाण्याची भीती आहे. जिल्हा रेडझोनमध्ये गेल्यास शिथिल केलेले नियम हटवून कडक नियमावली लागू होऊ शकते. ते टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.