CoronaVirus Lockdown : आंबा बागायतदारांना दिलासा; धावणार स्पेशल पार्सल ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:14 IST2020-04-20T11:09:13+5:302020-04-20T12:14:48+5:30
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी आपली सेवा सुरू ठेवली आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CoronaVirus Lockdown : आंबा बागायतदारांना दिलासा; धावणार स्पेशल पार्सल ट्रेन
रत्नागिरी : कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी आपली सेवा सुरू ठेवली आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उड्डपी या चार स्थानकांवर या पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही करता येणार असल्याने कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे. आज २० एप्रिलला ही गाडी ओखावरून रवाना होईल आणि २१ तारखेला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी, १ वाजून ४० मिनिटांनी कणकवली, ४ वाजून ५० मिनिटांनी मडगाव, तर ९ वाजून १० मिनिटांनी उड्डपी येथे पोहोचणार आहे. २४ एप्रिलला ही गाडी तिरुअनंतपुरम येथून निघून १ वाजून २० मिनिटांनी उड्डपी, ६ वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे.
व्यापारी, उत्पादक आंबा बागायतदार या गाडीमधून आपल्या मालाची ने आण करू शकतात. कोकण रेल्वेच्या चारही स्थानकातील पार्सल कार्यालयात या करीता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोकण रेल्वेने पहिल्या दिवसापासून महत्वाची भूमिका बजावली आहे. पार्सल ट्रेनच्या निमित्ताने कोकण रेल्वेने छोटे व्यावसायिक, उद्योजक आणि बागायदाराना मदतीचा हात दिला आहे .