नियमित बसफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:49+5:302021-05-26T04:31:49+5:30
कंटेन्मेंट झोन खेड : कोरोनाग्रस्त रुग्णांमुळे ग्रामीण भागात तातडीने कंटेन्मेंट कार्यान्वित केले जात आहे. या झोनमधील गावांमध्ये जाण्यास ग्रामस्थांना ...

नियमित बसफेरी
कंटेन्मेंट झोन
खेड : कोरोनाग्रस्त रुग्णांमुळे ग्रामीण भागात तातडीने कंटेन्मेंट कार्यान्वित केले जात आहे. या झोनमधील गावांमध्ये जाण्यास ग्रामस्थांना अटकाव करण्यात येत आहे. तालुक्यात ८३८ कंटेन्मेंट झोन कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र त्यामध्ये आता घट झाली असून अवघ्या ३५ ठिकाणी कंटेन्मेंट झोन कार्यान्वित आहेत.
वेतनाची मागणी
रत्नागिरी : कोरोना काळात ग्रामपंचायत कर्मचारी अल्पवेतनावर काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना कोरोना संपेपर्यंत प्रतिमहा एक हजार रुपये जादा वेतन मिळावे, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव कृष्णा होडे यांनी केली आहे.
रक्तदात्यांचा प्रतिसाद
चिपळूण : येथून जवळच असलेल्या शिरगाव येथील लिबर्टी एकता युवा मंच एस. ए. फिटनेस जिम आयोजित रक्तदान शिबिरात तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, दादा साळवी, राजू जाधव आदी उपस्थित होते.
साहित्य भेट
राजापूर : तालुक्यातील ओणी येथील वात्सल्य मंदिर बालकाश्रमाला पंचक्रोशी ग्रामविकास समितीने भेट देऊन, मुलांसाठी साहित्याचे वाटप केले. यावेळी समितीचे पदाधिकारी व वात्सल्य मंदिर संस्थेचे संचालक उपस्थित होते. थर्मामीटर, ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझर आदी वस्तू वितरित करण्यात आल्या.
वादळामुळे नुकसान
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गावाला वादळाचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी झाडे व घरांची मोडतोड झाली आहे. भिंतींना तडे जाऊन छत बाजूला सरकले आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. पोलीस पाटील व सरपंचांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तालुकाअंतर्गत सेवा सुरू
दापोली : कोरोनामुळे दापोली आगारातून बहुतांश बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र सोमवारपासून तालुकांतर्गत बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मंगळवारपासून मुंबई मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
डांबरीकरणाची मागणी
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील ४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २०२१ पूर्वी पूर्ण होईल, अशी ग्वाही ठेकेदारांनी दिली होती. मात्र अद्याप काम अपुरे असून पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे अपघाताचा धोका टाळण्यासाठी तातडीने या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
मोफत अन्नधान्य वाटप
चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथील साडेतीनशे कुटुंबांना अन्नधान्य व साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनील साळुंखे, दीपक साळुंखे, विलास साळुंखे उपस्थित होते. सामाजिक जाणिवेतून मोफत साहित्य वाटप आयोजित करण्यात आले होते.
अद्याप पंचनामे नाहीत
खेड : चक्रीवादळ होऊन आठवडा लोटला, तरी चिंचवली ढेबेवाडी येथील घरांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप केलेले नाहीत. तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधूून होत आहे. तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात वसलेली आहेत. ढेबेवाडी येथे पंचनाम्याची मागणी होत आहे.