मुंबईकरांच्या स्वागतास आरोग्य पथके सज्ज
By Admin | Updated: August 31, 2015 21:26 IST2015-08-31T21:26:42+5:302015-08-31T21:26:42+5:30
विविध आजारांबाबत जनजागृती : आठल्ये

मुंबईकरांच्या स्वागतास आरोग्य पथके सज्ज
मुंबई, पुणे येथे स्वाईन फ्लू, लेप्टो या रोगांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या रोगांमुळे रुग्ण दगावण्याच्या घटना समोर आल्या आहेत. जिल्ह्यात लेप्टोच्या रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. गणेशोत्सव तोंडावर आला आहे. मुंबई, पुणे येथे स्वाईन फ्लू, लेप्टोच्या रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात आतापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे. म्हणूनच गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्हावासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाला अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्लू, लेप्टो, डेंग्यू व अन्य रोगांबाबत जोरदार जनजागृती मोहीम राबविली जात आहे. तसेच गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मुंबई, पुण्यातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरुण आठल्ये यांनी सांगितले.गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणेसह अन्य शहरांतून लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यात कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टो, डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यामध्ये सतर्कता बाळगण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच महामार्गावर जिल्ह्याच्या सीमेच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. तसेच आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टो, डेंग्यू या रोगांचे रुग्ण आढळून आल्यास त्वरित औषधोपचार करण्यात येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्याशी ^‘लोकमत’ने साधलेला संवाद.
प्रश्न : जिल्ह्यात वैद्यकीय पथके कोठे तैनात करण्यात आली आहेत?
उत्तर :जिल्ह्यामध्ये १४ सप्टेंबरपासून वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. ही पथके खेड रेल्वे स्थानक, कशेडी घाट चेकपोस्ट, भरणे नाका, पर्शुराम घाट, वालोपे रेल्वे स्थानक, बहादूर शेख नाका, वहाळ फाटा, आरवली, डिंगणी फाटा, संगमेश्वर रेल्वे व बस स्थानक, बावनदी, हातखंबा तिठा, रत्नागिरी रेल्वे स्थानक, पाली बसस्थानक, वेरळ, आडवली रेल्वेस्थानक, कुवे चेकपोस्ट, लांजा बसस्थानक, निवसर रेल्वे स्थानक, राजापूर जकात नाका, मंडणगड आणि दापोली येथे कार्यरत राहणार आहेत. या वैद्यकीय पथकांमध्ये ४८ कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. यावेळी महसूल व वाहतूक पोलीस यांचीही मदत घेण्यात येणार आहे.
प्रश्न : जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य पथकामार्फत कोणकोणती तपासणी करण्यात येणार आहे ?
उत्तर :जिल्ह्यामध्ये बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच जिल्ह्याच्या सीमेच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत आरोग्याची तपासणी केली जाईल. यामध्ये आढळलेल्या तापाच्या रुग्णांच्या रक्ताचा नमुना घेऊन त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात येणार आहेत.
प्रश्न : मुंबईकर गावात येणार असल्याने कोणती काळजी घेण्यात येणार आहे ?
उत्तर :आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करुन कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, लेप्टो, डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या रोगांचा रुग्ण आढळून आल्यास त्वरित औषधोपचार करणात येणार आहे. तसेच या कालावधीमध्ये कोणीही मुख्यालय सोडू नये, अशा सक्त सूचना वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
प्रश्न : सध्या मुंबई, पुणे येथे स्वाईन फ्लू, लेप्टोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याबाबत कोणती दक्षता घेण्यात आली आहे?
उत्तर :रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु, लेप्टोचे २३ रुग्ण सापडले आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून, हे सर्व रुग्ण बरेही झाले आहेत. त्यातील एकही रुग्ण दगावलेला नाही.
प्रश्न : स्वाईन फ्लूची लक्षणे कोणती व कोणती काळजी घ्यावी?
उत्तर :या रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. ताप, खोकला, सर्दी, घशात खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, उलटी, जुलाब होणे, धाप लागणे, दम लागणे, तसेच श्वसन संस्थेचे विकार होतात. घरोघरी सर्वेक्षण करून या आजारांची लक्षणे दिसताच त्यांच्यावर त्वरित उपचार करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्वाईन फ्लूबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या रोगाला घाबरुन न जाता योग्य उपचार करुन घेतल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो. याबाबत गावोगावी प्रबोधन करण्याचे कार्य आरोग्य विभागाचे कर्मचारी युध्द पातळीवर करीत आहेत.
प्रश्न : लेप्टोस्पायरोसिसबाबत कोणत्या उपाययोजना योजल्या आहेत?
उत्तर :जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना लेप्टोबाबत सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये साथ नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेऊन नियमित सर्वेक्षण, निदान व त्वरित उपचार करणे यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लेप्टो हा भातशेती, खचरा येथील प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे पसरणारा व लेप्टोस्पायरोसिस या जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. काविळ, विषमज्वर, डेंग्यू यांसारख्या रक्तस्त्रावी आजाराच्या लक्षणाप्रमाणेच या आजाराची लक्षणे दिसून येतात. या रोगाचे निदान रुग्णाचे रक्त, लघवी प्रयोगशाळेत तपासून करता येते.
प्रश्न : जिल्ह्यामध्ये कोणतीही साथ उद्भवू नये म्हणून जनतेला कोणता संदेश द्याल?
उत्तर :साथींच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी वैयक्तिक पातळीपासून समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न करणे, काळजी घेणे आणि प्रतिबंध करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जनतेने पिण्याचे पाणी उकळून गार करुन पिणे, पाणी शुध्दीकरणासाठी मेडिक्लोर, क्लोरिन टॅबलेटचा वापर करावा, तसेच घराच्या आजूबाजूला पावसाचे पाणी साठू देऊ नये, राहता परिसर स्वच्छ ठेवावा, पिण्याचे पाणी साठवण्याची भांडी घट्ट झाकून ठेवावीत, उघड्यावरील व शिळे अन्न खाऊ नये, उघड्यावर व पिण्याच्या पाण्याच्या साठ्याजवळ शौचास बसू नये, वैयक्तिक स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करावे, सांडपाणी व कचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावावी तसेच साथीच्या आजारांवर डॉक्टरांकडून त्वरित औषधोपचार करुन घ्यावे.
प्रश्न : या मोहिमेमध्ये कोणाकाणाचा सहभाग आहे?
उत्तर : जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार आणि आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. ते याचा सातत्याने आढावा घेत आहेत. जिल्ह्यात कोठेही साथरोग पसरणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
- रहिम दलाल