रत्नागिरी थांबली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:18+5:302021-04-11T04:31:18+5:30
रत्नागिरी : ‘वीकेण्ड’ लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच रत्नागिरी शहरात पोलीस यंत्रणेने मजबूत फळी उभारल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ...

रत्नागिरी थांबली...
रत्नागिरी : ‘वीकेण्ड’ लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच रत्नागिरी शहरात पोलीस यंत्रणेने मजबूत फळी उभारल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. शासनाने दोन दिवसांचा जनता कर्फ्यू आधीच जाहीर केल्याने ठरावीक व्यक्ती वगळता सर्व मार्गांवर शुकशुकाट पसरला होता. अधूनमधून येजा करणाऱ्या दुचाकीस्वारांना तसेच चारचाकींना करडी नजर असलेल्या पोलिसांकडून हटकण्यात येत होते. या वीकेण्ड लाॅकडाऊनला संपूर्ण जिल्ह्यात प्रतिसाद मिळाल्याने सर्वत्र कमालीची शांतता दिसून येत होती.
शनिवारी कडक लाॅकडाऊन जाहीर केल्याने सकाळी रत्नागिरीत तशी उशिराच काहीअंशी वर्दळ सुरू असल्याचे चित्र होते. एरव्ही, विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेले इतरत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून गप्पा मारताना दिसायचे. मात्र, शनिवारी सर्वच ठिकाणी शुकशुकाट होता. किराणा दुकाने, दूध सेंटर्स, गॅस एजन्सी, औषधविक्रेते यांची दुकाने सुरू होती. हळूहळू वर्दळ वाढतेय, असे लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, ग्रामीणप्रमाणेच शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार असलेले पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह शहरातील मुख्य भागात जाेरदार फळी उभी केली. सकाळी नेहमीच्या कामावर जाणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून कुठलाच अडसर झाला नाही. नगर परिषदेचे सफाई कामगार आपल्या नियमित वेळेनुसार सर्व ठिकाणी साफसफाई करण्याचे काम करत होते.
जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी या लाॅकडाऊनला विरोध करीत दुकाने सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली होती. त्यासाठी आंदोलने करून रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आल्याने व्यापारी संघटनेने या लाॅकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारपेठांमध्ये दरदिवशी दिसणारी गर्दी नव्हती. बाजारपेठेचे मार्ग निर्मनुष्य झाल्याने बाजारपेठेत सामसूम पसरली होती. जिल्हाभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये ही स्थिती होती.
दिवसभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहिल्याने सर्वच दुकाने बंद होती. त्याचबरोबर नागरिकही फारसे बाहेर पडताना दिसले नाहीत. अगदी महत्त्वाच्या कामासाठीच नागरिक येजा करत होते. वीकेण्ड लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिक तसेच व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
चाैकट
जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्री काढलेल्या पुरवणी आदेशानुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्ये आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून गॅरेज, सी.ए. यांची कार्यालये, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, नागरिक सुविधा केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र एक खिडकीचा वापर करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट, ढाबे सुरू राहतील. मात्र, ग्राहकाला बसून सेवा न पुरविता पार्सल सेवा द्यावी लागेल. अत्यावश्यक सेवा म्हणून वृत्तपत्र सेवा, चष्म्याची दुकाने सुरू ठेवता येतील.