हौसेला मोल नाही; पसंतीच्या क्रमांकासाठी रत्नागिरीकरांनी मोजले ९६ लाख रुपये

By शोभना कांबळे | Updated: April 26, 2025 18:31 IST2025-04-26T18:30:51+5:302025-04-26T18:31:43+5:30

शोभना कांबळे रत्नागिरी : हाैसेला मोल नसते, म्हणतात, ते खोटे नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील ८५३ वाहनचालकांनी पसंतीच्या क्रमांकांसाठी ३ हजार ...

Ratnagiri residents paid Rs 96 lakh for their preferred number | हौसेला मोल नाही; पसंतीच्या क्रमांकासाठी रत्नागिरीकरांनी मोजले ९६ लाख रुपये

संग्रहित छाया

शोभना कांबळे

रत्नागिरी : हाैसेला मोल नसते, म्हणतात, ते खोटे नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील ८५३ वाहनचालकांनी पसंतीच्या क्रमांकांसाठी ३ हजार रुपयांपासून अगदी अडीच लाखांपर्यंत खर्च केला आहे. या हाैसेपाेटी चाॅइस नंबरमधून गेल्या साडेतीन महिन्यात येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत तब्बल ९६ लाख २६ हजार रुपयांची भर पडली आहे.

नवीन वाहन खरेदी करताना बहुतांश वाहनचालकांना विशिष्ट क्रमांक हवा असताे. काहींना जन्माचे वर्ष, लग्नाचे वर्ष, ठराविक लक्षात ठेवण्याजोगा क्रमांक किंवा शुभ मानला जाणारा क्रमांक हवा असताे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याचीही तयारी असते. आपल्याला चाॅइस क्रमांक हवा असेल तर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे त्यासाठी शुल्क भरून नंबर मिळवावा लागतो. हे शुल्क क्रमांकानुसार अगदी पाच हजारांपासून पाच लाखांपर्यंत असते.

रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते १५ एप्रिल या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ८५३ वाहनचालकांनी ३ हजारापासून अडीच लाखांपर्यंत शुल्क भरले आहे. यात दुचाकी, कार, खासगी वाहने, रिक्षा, रिक्षा टेंपो, बस आणि डंपर या वाहनांचा समावेश आहे. या नंबरमध्ये १ आणि ९ या आकड्यांना आणि त्यापुढील ० ला अधिक प्राधान्य दिले आहे. या हाैसेपायी मोजलेल्या शुल्कातून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मात्र मालामाल झाले आहे.

प्रत्येकाला आपल्या वाहनासाठी विशिष्ट क्रमांक असावा, असे वाटते. त्यामुळे वाहनचालक जन्म वर्ष, जन्मतारीख किंवा शुभ असलेला अंक, सम संख्या, विषम संख्या अशा प्रकारचे वाहनांचे नंबर खरेदी करतात. गेल्या साडेतीन महिन्यांत जिल्ह्यात ८५३ वाहनचालकांनी चाॅइस क्रमांकासाठी भरलेल्या शुल्कातून या कार्यालयाला ९० लाख २६ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.- राजवर्धन करपे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

शुल्क (रुपयात) - वाहनांची संख्या
३००० - १
५०००  - २८४
६००० - २११
७००० - ९०
१०,००० - ७६
१५,००० - ६४
१८,००० - ७१
२१००० - १६
२५,००० - २१
४५,००० - १०
७०,००० - २
७५,०००-  ४
१,००,००० - २
२,५०,००० - १

Web Title: Ratnagiri residents paid Rs 96 lakh for their preferred number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.