रत्नागिरी : क्रीडांगण बनले मद्यपींचा अड्डा, प्रेक्षक गॅलरीवरील पत्रे तुटलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:57 IST2018-05-07T18:57:59+5:302018-05-07T18:57:59+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची सुरक्षाच आता रामभरोसे राहिली आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट नसल्याने रात्रीच्यावेळी याठिकाणी पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. क्रीडांगणातील प्रेक्षक गॅलरी म्हणजे मद्यपींचा अड्डाच बनला आहे. या पार्ट्या करणारे बाटल्या मात्र तेथेच टाकून निघून जात असल्याने याठिकाणी बाटल्यांचा खच पडू लागला आहे.

रत्नागिरी : क्रीडांगण बनले मद्यपींचा अड्डा, प्रेक्षक गॅलरीवरील पत्रे तुटलेले
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची सुरक्षाच आता रामभरोसे राहिली आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट नसल्याने रात्रीच्यावेळी याठिकाणी पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. क्रीडांगणातील प्रेक्षक गॅलरी म्हणजे मद्यपींचा अड्डाच बनला आहे. या पार्ट्या करणारे बाटल्या मात्र तेथेच टाकून निघून जात असल्याने याठिकाणी बाटल्यांचा खच पडू लागला आहे.
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच मारूती मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उभारण्यात आले आहे. रणजीसारखे सामने ज्या क्रीडांगणावर खेळविण्यात आले, त्याच क्रीडांगणाची आता बिकट अवस्था झाली आहे.
क्रीडांगणावरील हिरवळ तर नामशेष झाली असून, याठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंना लाल मातीतच रंगून जावे लागत आहे. त्यातही एखाद्या खेळाडूने पडून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला तर हातपाय मोडण्याचीच भीती अधिक असते. त्यामुळे अनेकजण घाबरतच याठिकाणी सराव करताना दिसतात.
क्रीडांगणावर असलेल्या प्रेक्षक गॅलरीवरील पत्रे तुटल्याचे विदारक चित्रही बघायला मिळत आहे. या तुटलेल्या पत्र्यांचे तुकडे खाली बसणाऱ्या प्रेक्षकांच्या अंगावरच पडण्याची अधिक भीती असते. याच प्रेक्षक गॅलरीत पक्ष्यांनी इतकी घाण करून ठेवली आहे की, प्रेक्षक गॅलरीत पाऊल ठेवणेही नकोसे वाटत आहे.
क्रीडांगणाच्या सभोवताली संरक्षक भिंत असली तरी बंदिस्त गेटच नसल्याने रात्रीच्यावेळी क्रीडांगणात ओल्या पार्ट्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रेक्षक गॅलरीत बिनधास्तपणे बसून त्याठिकाणी दारू पिऊन बाटल्या तिथेच टाकल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
क्रीडांगणावर सकाळी येणाऱ्या अनेकांना या बाटल्यांचे दर्शन घडत आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट करण्याची आवश्यकता असून, त्याकडे कित्येक वर्ष पालिकेकडून दुर्लक्षच करण्यात आले आहे.
सगळच रामभरोसे
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर येण्यासाठी मुख्य दरवाजा आहे. हा दरवाजा कायमस्वरूपी बंदच असतो. मात्र, त्याशिवाय अनेक ठिकाणी मोठे गेट करून ठेवण्यात आल्याने कोणीही क्रीडांगणावर प्रवेश करू शकतो. या गेटना कोठेच दरवाजेच नसल्याने क्रीडांगणाची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कुणीही कसेही याठिकाणी येते.