रत्नागिरी पाेलिसांनी घडवून आणली तेलंगणातील वृद्धाची कुटुंबीयांशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:24+5:302021-03-23T04:33:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मनोरुग्ण असलेल्या व तेलंगणातून गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे बेवारसरीत्या फिरत असलेल्या एका वृद्धाची त्याच्या ...

रत्नागिरी पाेलिसांनी घडवून आणली तेलंगणातील वृद्धाची कुटुंबीयांशी भेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मनोरुग्ण असलेल्या व तेलंगणातून गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे बेवारसरीत्या फिरत असलेल्या एका वृद्धाची त्याच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याचे काम रत्नागिरीतील पाेलिसांनी केली आहे. हरवलेल्या वृद्धाला अनेक महिन्यांनी पाहिल्यानंतर कुटुंबीयांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले हाेते.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजापीपीएल कंपनीजवळील बसस्टॉपच्या शेडमध्ये राहणाऱ्या वैकन्ना वीरय्या वरीकोपल्ला (वय ५८, रा. ग्राम आक्रोम जि. नालगोंडा रा. तेलंगणा) असे त्या वृध्दाचे नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते विमनस्य अवस्थेत कंपनीजवळील शेडमध्ये राहत असल्याचे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. वैकन्नाला फक्त तेलगू भाषा येत असून, कंपनीत तेलगू भाषा येणाऱ्या स्टाफने त्याची चौकशी करुन याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्या वृध्दाच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी तेलंगणा राज्यातील पोलिसांशी संपर्क साधला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधून वैकन्ना यांना गुहागरहून रत्नागिरीत आणण्यास सांगितले. वैकन्ना यांना मनोरुग्ण असल्याचे लक्षात येताच त्यांना प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. याच कालावधीत मोबाइलवर नातेवाइकांशी संपर्क करून प्रौढाची ओळख पटल्यावर त्यांचे नातेवाईक रत्नागिरीमध्ये आले व ते त्यांना हैदराबादला घेऊन गेले.
वैकन्ना यांच्या मुलींना मराठी किंवा हिंदी भाषा येत नव्हती. त्यांना फक्त तेलगू भाषा येत होती. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरून रत्नागिरी पोलिसांबाबत असलेले कृतज्ञतेचे भाव ओळखून येत होते. वैकना यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यास पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार शांताराम झोरे व नितीन डोमणे यांनी सहभाग घेतला हाेता. तसेच राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.