रत्नागिरी नगर परिषद तयार करणार घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:04 IST2021-01-16T13:02:44+5:302021-01-16T13:04:35+5:30
Garbage Disposal Issue Ratnagiri- रत्नागिरी शहराचे विस्तारीकरण व भविष्याचा विचार करून नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा तयार करण्यात येणार आहे. मात्र, एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने नगर परिषदेने फेरआराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी नगर परिषद तयार करणार घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा
रत्नागिरी : शहराचे विस्तारीकरण व भविष्याचा विचार करून नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा तयार करण्यात येणार आहे. मात्र, एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने नगर परिषदेने फेरआराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दांडेआडोम येथे १५ कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार होता. अडीच हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारून कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया होणार आहे. त्यावर बायोगॅस प्रकल्प, वीज प्रकल्प, खत प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रदूषणही नाही किंवा काही वायाही जाणार नाही, असा दावा यापूर्वी परिषदेने केला आहे. त्याचा डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
सध्या कंपाउंड आणि अंतर्गत रस्त्यांचा एक कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी सर्वकाही करण्याचा नगर परिषदेचा विचार आहे. शहरापासून काही किलोमीटर लांब असल्याने त्याचा विचार करून फेरआराखडा तयार केला जाणार आहे.
घनकचरा प्रकल्पासाठी दांडेआडोम येथील जागा निश्चित केली. मात्र, त्याला दांडेआडोम येथील ग्रामस्थांनी विरोध केला असून, ते नगर परिषदेच्या विरोधात न्यायालयात गेले.
अनेक वर्षे ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत नगर परिषदेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात सुमारे २२ टन कचरा दररोज संकलित करून या कचऱ्यावर प्रस्तावित घनकचरा प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाणार आहे.
प्रदूषण होणार नसल्याचा दावा
शहरातील संकलित केलेल्या कचऱ्यावर थेट प्रक्रिया केली जाणार आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करून ते सिमेंट कंपनीला दिले जाणार आहे. वैद्यकीय कचऱ्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याने दुर्गंधी किंवा प्रदूषणाचा प्रश्नच निर्माण होणार नसल्याचा दावा नगर परिषदेने केला आहे.