डॉक्टरांच्या साहित्य संमेलनात रत्नागिरीची छाप
By Admin | Updated: March 2, 2016 23:57 IST2016-03-02T22:43:43+5:302016-03-02T23:57:49+5:30
पहिलेच संमेलन : विविध समस्यांवर ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’

डॉक्टरांच्या साहित्य संमेलनात रत्नागिरीची छाप
रत्नागिरी : इंडियन मेडिकल असोसिएशनने धुळे येथे आयोजित केलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या (अॅलोपॅथी) पहिल्या राष्ट्रव्यापी साहित्य संमेलनात रत्नागिरी ‘आय. एम. ए’च्या चमूने डॉक्टरांच्या समस्येवर ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ ही नाटिका सादर करून वेगळी छाप पाडली.
डॉ. अलका मांडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वैद्यकीय साहित्य संमेलनाचे प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर प्रमुख अतिथी होते. यावेळी ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ या नाटिकेचे लेखक डॉ. नीलेश नाफडे, दिग्दर्शक डॉ. निनाद नाफडे, डॉ. शशांक पाटील, डॉ. मतीन परकार, डॉ. महेश भोगटे यांनी ही नाटिका सादर केली. अखंड मेहनतीने डॉक्टर झाल्यानंतर एक नवीन डॉक्टर दवाखाना सुरू करतो. मात्र, गर्भलिंग चाचणीला कायद्याने विरोध असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यास आलेली मंडळी त्याला नानाविध सल्ले देतात. जसे की, सूचनापाट्या रूग्ण तपासणी करण्यासाठी झोपल्यानंतरही त्याला दिसायला हव्यात, अगदी डॉक्टरने पेन कुठल्या खिशाला लावलेय त्यावरून स्त्री - पुरूष गर्भाबाबत सूचक इशारा देऊ शकते, करत नसलेल्या कामासाठीही (उदा. गर्भपात) एक वेगळे रजिस्टर अशा असंख्य सूचनांनी तो डॉक्टर बेजार होतो. त्यातच राजकारण्यांची फुकट सेवा मिळण्यासाठीची धडपड, दादागिरी, रूग्णांचे वेगवेगळे प्रकार, सोसायटीच्या सेक्रेटरीची जादा पाणी वापरल्याची, रूग्णांनी वेड्यावाकड्या पद्धतीने गाड्या लावण्याची तक्रार यातून त्या नव्या डॉक्टरची उडणारी तारांबळ या नाटिकेत सादर करण्यात आली आहे. थोडक्यात डॉक्टरांची दशा आणि व्यथा यात मांडण्यात आली आहे.
केवळ प्रामाणिकपणे व्यवसाय करून उपयोग नाही, तर समाजाची व्यवस्थित हाताळणी करू शकणारे कसबी, व्यवहारी डॉक्टर हवेत. अन्यथा ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ असे म्हणण्याची पाळी येईल. तसेच चांगली सेवा मिळण्यासाठी समाजाच्या सहकार्याची गरज असते, हा संदेश या नाटिकेतून देण्यात
आला.
उत्कृष्ट लेखन, प्रभावी सादरीकरण आणि सर्व कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यामुळे रत्नागिरीच्या ‘आय. एम. ए’ ग्रुपने या संमेलनात बाजी मारली. नाफडेबंधूंच्या वेगवेगळ्या विषयावरील ‘चारोळ्या’ चांगल्याच भाव खाऊन गेल्या.
दोन दिवस चाललेल्या या डॉक्टरांच्या साहित्य संमेलनात पुस्तकामागचे डॉक्टर, कवीसंमेलन, नाटिका असे विविध कार्यक्रम रंगले. या संमेलनात डॉक्टरांनी लिहिलेल्या सात पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)