अनिश्चित काळासाठी ‘रत्नागिरी गॅस’ बंद

By Admin | Updated: June 29, 2014 00:57 IST2014-06-29T00:57:47+5:302014-06-29T00:57:47+5:30

विशेष जपणुकीसाठी धांदल सुरू

Ratnagiri Gas' closed for indefinitely | अनिश्चित काळासाठी ‘रत्नागिरी गॅस’ बंद

अनिश्चित काळासाठी ‘रत्नागिरी गॅस’ बंद

संकेत गोयथळे ल्ल गुहागर
गॅस पुरवठ्यामधील अनिश्चितता आणि त्यामुळे सातत्याने बंद होणारी वीज निर्र्मिती यामुळे रत्नागिरी वायू आणि ऊर्जा प्रकल्प अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्प बंद केल्यानंतरही आतील यंत्रांची योग्य देखभाल (प्रिझर्व्हेशन) व्हावी, यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असल्याने प्रकल्प बंद होत असल्याच्या मुद्द्याला दुजोरा मिळाला आहे.
आता प्रकल्प बंद होत असल्याने पुढील काळातील देखभालीची गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने आवश्यक साधनसामुग्रीची तयारी कंपनी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक त्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
एन्रॉन प्रकल्प बुडीत गेल्यानंतर पुंजलॉईड कंपनी यंत्रसामुग्रीची देखभाल करत होती. भारनियमनाचे संकट लक्षात घेऊन २००५ मध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हा प्रकल्प रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प या नावाने सुरू केला. प्रकल्प सुरू करताना अनेक अडचणी आल्या. पुढील काळात कोट्यवधीची टर्बाईन्स व इतर यंत्रसामुग्री नव्याने बदलण्यात आली. त्यानंतर प्रकल्प सुरळीत सुरू झाला. गेली काही वर्षे प्रकल्प सुस्थितीत होता. त्यातून सरासरी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती होत होती. एकदा १९00 मेगावॅट इतके वीज उत्पादनही या प्रकल्पाने केले. वीज निर्मितीसाठी आवश्यक गॅस रिलायन्सच्या गोदावरी प्रकल्पातून मिळत होता. मात्र, त्याच दरम्यान गॅस पुरवठ्याची ओरड सुरू झाली. पहिल्यांदा २६ जानेवारी २०१३ ला गॅसअभावी वीज निर्मिती बंद झाली. त्यानंतर कमी जास्त फरकाने ही स्थिती कायम राहिली. आता सप्टेंबर २०१३ पासून प्रकल्प बंद स्थितीत आहे. गॅस उपलब्धतेबाबत कोणत्याच सकारात्मक हालचाली होत नसल्याने आता प्रकल्प अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
या प्रकल्पाचे प्रिझर्व्हेशन (विशेष जपणूक) करण्यासाठी मागविलेले ब्लोअर प्रकल्पामध्ये आले आहेत. पॉवर ब्लॉकमध्ये टर्बाईन व इलेक्ट्रॉनिक यंत्रणेसाठी आवश्यक वातावरण ठेवण्यासाठी ब्लोअरद्वारे गरम हवा बाहेर फेकली जाते. प्रिझर्व्हेशनचा दुसरा भाग म्हणून ’ह्युमिडिफायर’ची जाहीर निविदा काढण्यात आली आहे. पावसाळी व हिवाळी हंगामात हवेत आर्द्रता असते. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमधील छोटे कंडक्टर शॉर्ट होऊ शकतात यासाठी हवेतील आर्द्रता ’ह्युमिडिफायर’द्वारे काढली जाते. या दोन्ही यंत्रणा मागविण्यात येत असल्याने प्रकल्प बंद राहणार, यावर शिक्कामोेर्तब झाले आहे.

Web Title: Ratnagiri Gas' closed for indefinitely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.