राज्याच्या रिकव्हरीपेक्षा रत्नागिरी जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:56 IST2020-12-11T17:55:02+5:302020-12-11T17:56:26+5:30
corona virus, Hospital, Ratnagirinews वेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध घेणे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण चांगले आहे. नवीन रुग्णांचा कमी होत जाणारा वेग हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.

राज्याच्या रिकव्हरीपेक्षा रत्नागिरी जिल्हा अव्वल
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : वेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध घेणे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण चांगले आहे. नवीन रुग्णांचा कमी होत जाणारा वेग हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.
राज्याचे रिकव्हरीचे प्रमाण ९२.४९ टक्के असून, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमाण ९४.३६ टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण सापडला. मार्चपासून जूनपर्यंत रुग्णवाढीचा वेग खूपच कमी होता.
ज्यावेळी जिल्ह्यांच्या सीमांवरील बंदी उठवण्यात आली, तेव्हा मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातील विशेषत: मुंबईतील कोकणवासीय रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यामुळे जुलै महिन्यापासून हा वेग वाढू लागला.
जुलै महिन्यात १,२१२ रुग्ण सापडले होते. मात्र, ऑगस्टमध्ये ही संख्या २,१०६ इतकी झाली. सप्टेंबर महिन्यात तब्बल ३४७६ रुग्ण सापडले. ऑक्टोबर महिन्यापासून ही संख्या कमी झाली.
तपासण्या वाढू लागल्यानंतर रत्नागिरीत स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली. त्यामुळे निदान लवकर होऊ लागले. निदान वेळेवर होत असल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याला गती देण्यात आली. त्यावेळी फक्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालय हेच कोविड रुग्णालय होते. मात्र, जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये रुग्ण सापडत असल्याने कोविड रुग्णालयांची संख्या वाढवण्यात आली.
प्रत्येक तालुक्यात कोविड रुग्णालय झाल्याने उपचारांना गती आली. एका बाजूला जलद उपचार आणि दुसऱ्या बाजूला कमी झालेले रुग्ण यामुळे कोरोना रिकव्हरीचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढू लागले आहे.