रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारल्या कलाकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:02 IST2018-03-29T18:02:56+5:302018-03-29T18:02:56+5:30
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय, दैनंदिन अध्ययन यातून काहीवेळ बाहेर पडून स्वच्छंदपणे सृजनशीलतेला मोकळीक देता यावी, या हेतूने आबलोलीतील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या कला विभागातर्फे कलाशिक्षक स्वरुप केळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाडूच्या मातीपासून विविध कलाकृती साकारणे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारल्या कलाकृती
आबलोली : विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय, दैनंदिन अध्ययन यातून काहीवेळ बाहेर पडून स्वच्छंदपणे सृजनशीलतेला मोकळीक देता यावी, या हेतूने आबलोलीतील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या कला विभागातर्फे कलाशिक्षक स्वरुप केळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाडूच्या मातीपासून विविध कलाकृती साकारणे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पर्यावरणपूरक शाडूची माती आणि रंग वापरुन विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकौशल्यातून मातीच्या विविध कलाकृती साकारल्या. यावेळी आपल्या कलाकृतीला अधिक दर्जेदार बनवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नशील होता.
गणपती कारखान्यातून माती आणणे, खडे बारीक करुन घेणे, माती मळणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांना मातीकाम करताना कोणत्याही प्रकारचे बंधन नसल्याने प्रत्येकाने आपल्या कल्पनेनुसार, आवडीनुसार कलाकृती बनवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आकर्षक रंगसंगतीने कलाकृतीला सजवले. यावेळी विद्यार्थ्यांनी इग्लू, हत्ती, मानवी मुखवटे, विविध फळे, विविध प्रकारची भांडी, मनोरे, फुले, घरांची प्रतिकृती आदी विविध कलाकृती साकारल्या. कलाशिक्षक स्वरुप केळसकर आणि सहभागी विद्यार्थी यांचे मुख्याध्यापक सी. डी. कुंभार, पर्यवेक्षक एम. आर. साळुंखे, शिक्षक, कर्मचारी यांनी कौतुक केले.