आवाशी : मुंबई-गोवा महामार्गावर लोटे पोलीस दूरक्षेत्रानजीक दुर्मीळ बिबट मांजर या वन्यप्राण्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२३) पोलीस दूरक्षेत्र लोटे येथे कार्यरत असलेले होमगार्ड प्रणित कांबळे यांनी वनविभागाला माहिती दिली. ही घटना पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडली.दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, खेड वनपाल सुरेश उपरे, चिपळूण वनपाल दौलत भोसले, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अज्ञात वाहनांच्या धडकेत या दुर्मीळ बिबट मांजराचा महामार्ग ओलांडताना मृत्यू झाला.खेडचे पशुधन विकास अधिकारी विनया जंगले यांच्याकडून तपासणी केली. बिबट मांजर हे ३ वर्षांचे व नर जातीचे होते. या प्रकरणी खेड वनपालमार्फत अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. बोराटे अधिक तपास करीत आहेत.
रत्नागिरीतील लोटे येथे दुर्मीळ बिबट मांजराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:31 IST