शिवसेनेच्या प्रकाश गुरव यांच्याविरुद्ध खंडणीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:42+5:302021-04-24T04:32:42+5:30
राजापूर : शिवसेनेचे राजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य प्रकाश गुरव यांच्याविरोधात एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची ...

शिवसेनेच्या प्रकाश गुरव यांच्याविरुद्ध खंडणीची तक्रार
राजापूर : शिवसेनेचे राजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य प्रकाश गुरव यांच्याविरोधात एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार केंद्र सरकारच्या महानेटचे काम करणाऱ्या ठेकेदाराने राजापूर पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी प्रकाश गुरव व त्यांचे चिरंजीव प्रसाद गुरव यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
देशाच्या लोकशाहीचा पाया असणाऱ्या ग्रामपंचायती थेट केंद्र सरकारशी जोडल्या जाव्यात यासाठी केंद्र सरकारने महानेट फायबर केबल जोडणीचे काम देशपातळीवर सुरू केले आहे. राजापूर तालुक्यातही महानेट फायबरचे काम जोरदारपणे सुरू असून सद्य:स्थितीत हे काम तालुक्यातील सोलगाव ते देवाचे गोठणे या परिसरात सुरू आहे. हे काम लक्ष्मणराव दशरथ सूर्यवंशी (रा. खेराडे वांगी, कडेगाव, जिल्हा सांगली) करत असून या कामात अडथळा आणल्याची व एक लाख रुपयाची खंडणी प्रकाश गुरव यांनी मागितल्याची तक्रार एका अर्जाद्वारे त्यांनी राजापूर पोलिसांकडे केली आहे. सूर्यवंशी हे या कंपनीचे प्राेजेक्ट मॅनेजर आहेत.
सोलगाव ते देवाचे गोठणे येथे काम सुरू असताना प्रकाश गुरव व त्यांचा मुलगा प्रसाद गुरव यांनी तेथे येऊन आम्हाला शिवीगाळ करून धमकी दिली. दि. २२ व २३ एपिल रोजी या दोघांनी हे काम बंद पाडले आहे. काम सुरू करावयाचे असल्यास एक लाख रुपये द्या, अशी मागणी केल्याचे सूर्यवंशी यांनी आपल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. महानेट फायबरचे काम स्टरलाईट इंडिया या कंपनीने घेतले असून, राजापूर तालुक्यात दर्शन एंटरप्रायझेस व सिलिकॉन केअर या दोन कंपन्या सहठेकेदार म्हणून हे काम करीत आहेत.
.................
पैशांची मागणी झाली
कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर लक्ष्मणराव सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता केंद्र शासनाने नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही काम करीत आहोत, असे ते म्हणाले. हे काम करताना आम्ही कोणाचेही वैयक्तिक नुकसान करीत नाही, तरीही प्रकाश गुरव व प्रसाद गुरव यांनी आमच्या कामात अडथळा निर्माण करीत पैशांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
.................
नाहक बदनामीचा प्रयत्न
याबाबत प्रकाश गुरव यांच्याशी संपर्क साधला असता आपण कोणाकडेही पैसे मागितलेले नाहीत आणि महानेटचे कामही थांबविलेले नाही, असे स्पष्ट केले. देवाचे गोठणे ठोंबरेवाडी येथे महानेटची टाकलेली केबल ग्रामस्थांसाठी अडचणीची ठरत होती. त्यामुळे ग्रामस्थांनी काम बंद पाडले. तेथे जाऊन ग्रामस्थ व कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच तेथे पोल टाकण्याच्या सूचना केल्या. हा नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे गुरव यांनी सांगितले.