रायपाटण सरपंचांवर बहुमताचा ‘अविश्वास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 23:56 IST2016-07-19T22:30:12+5:302016-07-19T23:56:43+5:30
आठविरूध्द एक : गांगण यांनी पद गमावले

रायपाटण सरपंचांवर बहुमताचा ‘अविश्वास’
राजापूर : संपूर्ण तालुक्याचे नजरा लागून राहिलेल्या रायपाटण ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा अशोक गांगण यांच्या विरोधातील शिवसेनेच्याच आठ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आठ विरुध्द एक मताने मंजूर झाला. त्यामुळे गांगण यांना आपले पद गमवावे लागले.गेले काही दिवस राजापुरात रायपाटण सरपंच अविश्वास ठरावाचा विषय गाजत आहे. राजापूरचे तहसीलदार सचिन भालेराव यांच्या उपस्थितीत हा निर्णय लागला. रायपाटणचे सरपंचपद ओबीसी महिला राखीव असल्याने आता नूतन सरपंचपदी कोणाची नियुक्ती होते, याकडे संपूर्ण गावचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही विकासकामात सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशा अनेक कारणांनी रायपाटणच्या सरपंच सीमा गांगण यांच्याविरोधात सेनेच्याच आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.
हा ठराव उपसरपंच राजेश नलावडे यांनी मांडला, त्याला उर्वरित सदस्यांनी अनुमोदन दिले. त्या ठरावाची दखल घेऊन तहसीलदार भालेराव यांनी रायपाटणमध्ये विशेष सभा आयोजित केली होती. त्यामध्ये अविश्वास ठरावावर चर्चा झाली व तहसीलदारांच्या आदेशानुसार दाखल ठराव मतदानाला टाकण्यात आला. गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले.
यावेळी सरपंच गांगण यांच्याविरोधात आठ सदस्यांनी मतदान केले. गांगण यांना फक्त स्वत:चे मत पडले. त्यामुळे अविश्वासाचा हा ठराव मंजूर झाला. या ठरावाला आव्हान देण्यासाठी सरपंच गांगण यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर गावच्या सरपंचपदाचा कार्यभार उपसरपंचांकडे दिला जाईल. रायपाटणच्या सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल झाल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदी कोणाची नियुक्ती होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)