राजापुरात नाराज व्यापाऱ्यांनीही ठेवली दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:01+5:302021-04-11T04:30:01+5:30
शासनाने शनिवार, रविवार दाेन दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राजापुरातील सर्व दुकाने शनिवारी बंद ...

राजापुरात नाराज व्यापाऱ्यांनीही ठेवली दुकाने बंद
शासनाने शनिवार, रविवार दाेन दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राजापुरातील सर्व दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पसरला हाेता. (छाया : विनाेद पवार)
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर :
शासनाने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनला राजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शनिवारी मात्र उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली होती, तर अत्यावश्यक सेवेतील मेडिकल व दवाखाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद असल्याने राजापूर बाजारपेठेत निरव शांतता पसरली हाेती.
वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने राजापूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला असून, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राजापूर जवाहर चौक येथे विनाकारण मोटारसायकल व इतर वाहनांमधून फिरणाऱ्या नागरिकांची पूर्ण चौकशी करण्यात येत असून, विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.
राजापूर तालुका व्यापारी संघानेही शुक्रवारी रात्री उशिरा या दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनमध्ये आपापली दुकाने बंद ठेवून सामील होण्याचे आवाहन करत, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले हाेते. त्यानुसार, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली हाेती. नागरिकांनीही शनिवारी बाहेर पडणे टाळल्याने शहरात संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पसरला हाेता.
शुक्रवारी रात्रीपासूनच पोलीस प्रशासनाने राजापूर शहरात स्पीकरवरून नागरिकांना हा लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या लॉकडाऊनमधून वगळण्यात आली असली, तरी सर्वत्र अतिशय तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू होती. शहरातील रिक्षांचीही संख्या तुरळक प्रमाणात होती. महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालये व बॅंका बंदच हाेत्या. त्यामुळे नागरिकांची वर्दळ आणखीनच कमी झाली हाेती.