गुऱ्हाळमालकांचे ऊसदर कमी ठेवण्याचे रॅकेट
By Admin | Updated: October 30, 2015 23:23 IST2015-10-30T22:27:12+5:302015-10-30T23:23:43+5:30
पन्हाळा तालुका : गुऱ्हाळमालकांनी एफआरपीप्रमाणे दर द्यावा; शेतकरी संघटना आंदोलन करणार

गुऱ्हाळमालकांचे ऊसदर कमी ठेवण्याचे रॅकेट
नितीन भगवान -- पन्हाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कारखाने, गुऱ्हाळ मालकांकडून कमी दर मिळाल्याने अडचणीत आला आहे. गुऱ्हाळ मालकांनीही एफआरपीप्रमाणेच दर देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तालुक्यात ऊसदर कमी ठेवण्यासाठी गुऱ्हाळचालकांनी ‘रॅकेट’ तयार केले आहे. याप्रश्नी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्रीकांत घाटगे यांनी सांगितले.
पन्हाळा तालुक्यात एक खासगी व एक सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना आहे. एक सहकारी साखर कारखाना करवीरमध्ये आहे; पण ऊसक्षेत्र मात्र पन्हाळा तालुक्यातील जादा आहे. तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊसदर कमी देऊन अद्याप शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी देणेही थकीत ठेवले आहे. चालूवर्षी गळीत हंगामास आता सुरुवात झाली आहे; पण गेल्या हंगामातील अद्याप पैसे न मिळाल्याने प्रापंचिक खर्च व दैनंदिन अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच सोसायट्या व बँक प्रकरणास मर्यादा येऊ लागल्याने शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळमालकांना देऊ लागले आहेत; परंतु पन्हाळा तालुक्यातील गुऱ्हाळमालकांनी अघोषित एकी केली असून, कमीतकमी दर देण्याची एकी केली असल्याची गुऱ्हाळास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.
शासनाकडून गुऱ्हाळघरांची मोजदाद, तेथील स्वच्छता. शेतकऱ्यांना देण्यात येणारा दर, रोजचे उत्पादन, उत्पादन खर्चासाठी होणारा खर्च या सर्वांचे नियमन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे ऊस लागवडीचे खर्चाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ऊस बेणे, मशागत, लागवड, मजुरी, खते, औषधे याच्या खर्चाबरोबरच चालू हंगामात कमी पडणाऱ्या पावसामुळे पाणी देण्याचा आॅगस्टपासूनचा अतिरिक्त जादा खर्च, त्यामुळे उसाचा उत्पादन खर्च व मिळणारा दर यामुळे शेतकरी सध्या अर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते श्रीकांत घाटगे यांना या गुऱ्हाळमालकांच्या मनमानीबाबत विचारले असता म्हणाले की, गुऱ्हाळमालक शेतकऱ्यांची लूट करीत असल्याबद्दलची वस्तुस्थिती सत्य असल्याचे सांगितले.
उसाला १४०० ते १५०० भाव
गतवर्षी गुऱ्हाळमालक २२०० ते २५०० रु. टन याप्रमाणे उसाला दर देत होते. तोच दर चालू वर्षी १४०० ते १५०० रु. देताना दिसत आहेत. पन्हाळा तालुक्यात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन होते आहे. चालूवर्षी पाऊस नसल्याने गुऱ्हाळघरे लवकर चालू झाली आहेत. गुळाला मागील काही महिन्यांत २००० रु. टन असा भाव मिळत होता. यावेळी उसाला १४०० ते १५०० असा भाव प्रतिटन देत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना गुऱ्हाळमालक सरळसरळ लुटमार करताना दिसत आहेत.