रत्नागिरी : रत्नागिरीतील एमआयडीसीमधील एका प्लॉटवर गुरुवारी सकाळी छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या नेपाळी महिलेला ताब्यात घेतले आहे. तर, तिच्या ताब्यातून पुणे येथील दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजाेळे हद्दीतील एमआयडीसी येथील प्लाॅट ई - ६९ मध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची गाेपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले हाेते.पोलिस पथकाने बनावट ग्राहक पाठवून या प्रकाराबाबतची खात्री केली. खात्री पटल्यानंतर पथकाने ठरलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे एक नेपाळी महिला दोन महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याचे पाेलिसांना आढळले. पोलिसांनी तत्काळ तिच्यावर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल करून, तिला अटक केली आहे. त्याचवेळी, देहविक्रीच्या व्यवसायात अडकलेल्या दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. पुढील कारवाईसाठी हा गुन्हा रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पाेलिस निरीक्षक राजेंद्र यादव करत आहेत.या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर, संदीप ओगले, हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, महिला हेडकॉन्स्टेबल स्वाती राणे, शीतल कांबळे, महिला कॉन्स्टेबल पाटील आणि पोलिस नाईक दत्ता कांबळे यांचा समावेश होता.
रत्नागिरी एमआयडीसीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल; पुण्यातील दोघींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:56 IST