वैधमापन शास्त्र कार्यालयाकडून २२९ जणांवर खटले; १० लाखाचा दंड वसूल

By शोभना कांबळे | Updated: February 13, 2024 19:11 IST2024-02-13T19:10:50+5:302024-02-13T19:11:15+5:30

रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील २९२ आस्थापनांना अचानक भेटी देत केली पाहणी

Prosecution of 229 persons by the Office of Legal Metrology; A fine of 10 lakhs will be levied | वैधमापन शास्त्र कार्यालयाकडून २२९ जणांवर खटले; १० लाखाचा दंड वसूल

वैधमापन शास्त्र कार्यालयाकडून २२९ जणांवर खटले; १० लाखाचा दंड वसूल

रत्नागिरी : येथील उपनियंत्रक वैधमापन शास्त्र कार्यालयाने रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत २९२ आस्थापनांना अचानक भेटी दिल्या. यात २२९ जणांवर खटले नोंदविण्यात आले असून, १० लाख १२ हजार ३०० रूपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. तसेच वजने व मापन तोलन उपकरणे यांची पडताळणी व मुद्रांक शुल्क १ कोटी २९ लाख ३६ हजार ८९९ इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र प्रभारी उपनियंत्रक राम राठोड यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत वैध मापन शास्त्र यंत्रणा कार्यरत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिताचे जिल्हास्तरीय कार्यालय येथील जिल्हाधिकारी आवारात आहे. जिल्ह्यात तालुकास्तरीय निरीक्षक, वैध मापन शास्त्र कार्यालय रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण व दापोली येथे कार्यरत आहेत. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याकरिता मालवण, कणकवली व सांवतवाडी ही तीन कार्यालय आहेत.वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून वैध मापन शास्त्र कार्यालय अंतर्गत वजने व मापे यांची पडताळणी करणे, वजने मापे यांची तपासणी करणे व वजने मापे कायद्यांतर्गत वजनात व मापात फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई केली जाते. 

याचबरोबर पॅक बंद वस्तूवरील उद्घोषणा तपासणी, छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करणे, तसेच या कायद्यांतर्गत नोंदविलेले खटले न्यायालयात दाखल करणे अपराध्यांविरुध्द न्यायालयीन प्रकिया पार पाडून, अपराध्यांस शिक्षा होईल अशी कारवाई करणे. असे कामकाज केले जाते.रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत एकूण २९२ आस्थापनांना अचानक भेटी देण्यात आल्या. यामध्ये एकूण २२९ एवढे खटले नोंद करण्यात आले. यांपैकी १६२ खटले निकाली काढण्यात आले. 

भेटी देऊन कारवाई 

वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून नियमित, अचानकपणे व ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने आस्थापनेस भेटी देउन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द जिल्ह्यात व्यापकपणे कारवाई करण्यात येत आहे. आठवडे बाजार, दैनंदिन बाजार पेठा, भाजी मार्केट, मच्छी मार्केट व इतर बाजारपेठेंमधील दुकानांना भेटी देऊन कारवाई करण्यात येत आहे.

व्यापाऱ्यांकडून वजने व मापे यांची फसवणूक होत असल्यास, वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे तक्रार करावी. आपल्या तक्रारीवर सात दिवसांच्या आत कारवाई करुन ग्राहकांना याबाबत कळविण्यात येईल. ग्राहक तक्रारींकरिता कोकण भवन ०२२२७५७४०७४ टोल फ्री क्रमांक 1800114000/1915, ई मेल aclmratnagiri@yahoo.in/dyclmms@yahoo.in/dyclmmscomplaint@yahoo.com यावर संपर्क करावा.

Web Title: Prosecution of 229 persons by the Office of Legal Metrology; A fine of 10 lakhs will be levied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.