चिपळुणात घरपट्टी वसुलीचा उच्चांक
By Admin | Updated: March 26, 2015 00:13 IST2015-03-25T21:31:51+5:302015-03-26T00:13:26+5:30
पंचायत समिती : मार्चअखेरपर्यंत ९२ टक्क्यांपर्यंत होणार काम

चिपळुणात घरपट्टी वसुलीचा उच्चांक
चिपळूण : तालुक्यातील १३० ग्रामपंचायतीकडून वसूल होणारी घरपट्टी व पाणीपट्टी करवसुली यावर्षी समाधानकारक झालेली असून मार्चअखेरपर्यंत ती ९२ टक्क्यांहून अधिक होईल, अशी माहिती पंचायत समितीतर्फे देण्यात आली आहे.
दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून करवसुली केली जाते. तालुक्यातील एकूण १३० ग्रामपंचायतीकडून घरपट्टीपोटी २ कोटी ९० लाख २५ हजार ८०२ रुपये इतक्या करवसुलीचे उद्दिष्ट आहे. यावर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत २ कोटी ६१ लाख २३ हजार २२२ रुपये इतकी वसुल झाली आहे तर २९ लाख २ हजार ५८० रुपये वसुली बाकी आहे. पाणीपट्टी वसुलीपोटी २ कोटी १२ लाख ७५ हजार ३४२ रुपये येणे अपेक्षित असताना त्यापैकी १ कोटी ५१ लाख ५ हजार ४९३ रुपये वसुली झाली आहे. अजूनही ३६ लाख १६ हजार ८०८ रुपये इतकी शिल्लक रक्कम आहे. चिपळुणात यापूर्वी कळवंडेसह काही ग्रामपंचायती या दरवर्षी १ एप्रिलला संपूर्ण वर्षाची घरपट्टी भरणा करणारा उपक्रम राबवत आलेल्या आहेत. ठरलेल्या वेळी ग्रामस्थ करांचा भरणा करत नाहीत. असे असताना अलिकडच्या काळापासून या करवसुलीत तालुक्याने चांगली प्रगती केली आहे. मागील वर्षी घरपट्टी ९३ टक्के तर पाणीपट्टी ८० टक्के वसूल झाली होती. यावर्षी वसुलीचे प्रमाण सारखे असून ३१ मार्चपूर्वी गतवर्षीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. घरपट्टीची वसुली चांगली होत असताना पाणीपट्टीची वसुली रोडवली आहे. पाणी वेळेवर तसेच पुरेसे मिळत नाही, अशा अनेक तक्रारी सांगत अनेक ग्रामस्थ पाणीपट्टीची आपली ठरलेली रक्कम भरणा करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे पाणीपट्टी वसुली करण्यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मागे पडताना दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)
घरपट्टी
उद्दिष्ट२ कोटी ९० लाख २५ हजार ८०२ रुपये
वसुली२ कोटी ६१ लाख २३ हजार २२२ रुपये
पाणीपट्टी
उद्दिष्ट२ कोटी १२ लाख ७५ हजार ३४२ रुपये
वसुली१ कोटी ५१ लाख ५ हजार ४९३ रुपये