Promises for safe driving of two and a half thousand students | अडीच हजार विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहन चालविण्याची प्रतिज्ञा

रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीने शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देरोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलचा उपक्रम शाळा, महाविद्यालयांत वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन

संतोष मिठारी

कोल्हापूर : ‘मी भारताचा प्रामाणिक नागरिक असून, विनापरवाना वाहन चालविणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही. विनाकारण हॉर्न वाजविणार नाही. वयस्कर व्यक्तींना मदत करीन. स्वच्छता राखीन’, अशी प्रतिज्ञा कोल्हापूर शहरातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी केली आहे. रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलच्या उपक्रमात ते सहभागी झाले. या उपक्रमांतर्गत ‘रोटरी’च्या वतीने शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन केले जात आहे.

नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये वाहने चालविण्याबाबत मोठे आकर्षण असते. अनेकदा परवाना आणि वाहतुकीच्या नियमांची माहिती नसताना त्यांच्याकडून वाहन चालविण्यात येते. त्यातून अपघात घडले आहेत. ते टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलने ‘रोड सेफ्टी अवरनेस वर्कशॉप’ हा उपक्रम सप्टेंबर २०१८ पासून हाती घेतला.

याअंतर्गत ‘रोटरी’च्या या उपक्रमाचे समन्वयक रवी मायदेव, प्राचार्य डॉ. महादेव नरके, अभिजित माने यांच्याकडून रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांबाबत व्हिडीओ, छायाचित्रांचा समावेश असलेल्या पॉवरपाँईट प्रेझेंटेशनद्वारे ४५ मिनिटे मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत १0 शाळांतील अडीच हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी सुरक्षित वाहन चालविण्याची प्रतिज्ञा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १0 हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.

सिग्नल परिसरात लावणार रोडसाईन

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थी, तरुणाईचे प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे. ते लक्षात घेऊन आम्ही उपक्रम सुरू केला आहे. १0 हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे ध्येय आहे. एप्रिलमध्ये वाहतूक विभागाच्या सहकार्याने शहरातील प्रमुख चौकांतील सिग्नलच्या परिसरात रोडसाईन लावण्यात येणार आहेत. वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यासाठी हे रोडसाईन लावण्याचा उद्देश आहे, अशी माहिती रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.
 

 

Web Title: Promises for safe driving of two and a half thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.