खेर्डी औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन केंद्रासाठी कार्यवाही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:00+5:302021-04-11T04:31:00+5:30
चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीसाठी अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेचे चिपळूण तालुकाधिकारी उमेश खताते यांनी ...

खेर्डी औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन केंद्रासाठी कार्यवाही सुरू
चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीसाठी अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेचे चिपळूण तालुकाधिकारी उमेश खताते यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली होती. त्यांच्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले असून, रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.
शहरालगतचे खेर्डी हे उपशहर म्हणून ओळखले जाते. या गावाचा विस्तार झपाट्याने होऊ लागला आहे. औद्योगिक वसाहत, विस्तारित कार्यक्षेत्र, बाजारपेठ यांमुळे खेर्डी ही तालुक्यातील सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत मानली जाते. औद्योगिक वसाहत असल्याने आणि लगतच मोठी लोकवस्ती व बाजारपेठ असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे अग्निशमन केंद्र कार्यरत असणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत औद्योगिक वसाहतींमध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. चिपळूण तालुक्यात खेर्डी व गाणे-खडपोली औद्योगिक वसाहत असून एकही अग्निशमन बंब नाही. परिणामी एखादी आग लागल्यास त्याचा मोठा फटका बसतो. आग आटोक्यात आणण्यासाठी चिपळूण नगर परिषद किंवा लोटे येथून अग्निशमन बंब मागवावा लागतो. तोपर्यंत संबंधित व्यक्ती अथवा मालकाचे मोठे नुकसान झालेले असते.
खेर्डी एमआयडीसीमध्ये शासनाकडून अग्निशमन केंद्रासाठी इमारत उभारली आहे. मात्र, गेली २२ वर्षे ती इमारत वाहनांअभावी धूळ खात पडली आहे.
खेर्डी औद्योगिक वसाहतीच्या परिसरात अग्निशमन केंद्र उभारल्यास त्याचा फायदा संपूर्ण तालुक्याला होणार आहे. त्यासाठी युवा सेनेचे चिपळूण तालुका अधिकारी खताते यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह खासदार विनायक राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेत अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीला आता यश येत असल्याचे दिसत आहे.