जनतेची गैरसोय कायमची संपण्याची शक्यता
By Admin | Updated: January 15, 2015 23:35 IST2015-01-15T20:50:57+5:302015-01-15T23:35:54+5:30
दापोलीत दोन पूल : गैरसोय संपणार, १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

जनतेची गैरसोय कायमची संपण्याची शक्यता
आंजर्ले : दापोली शहरातील केळसकर नाक्याच्या अलिकडे दापोली - हर्णै रस्त्यावरच्या दोन अरूंद व जीर्ण झालेल्या पुलांमुळे होणारी गैरसोय आता लवकरच थांबणार आहे. दोन नवीन रूंद पूल उभारण्यासाठी १ कोटी २० लाखाचा निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. दापोली शहराचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. शहराच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत. दापोली शहर जालगाव, गिम्हवणे, मौजे दापोली, टाळसुरे या लगतच्या गावांना कधीच जोडले गेले आहे. शहराचा होणारा विस्तार व वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन शहरातील मुख्य दापोली बसस्थानक ते मेहंदळे आश्रम व खोंडा ते हॉटेल जयंत-पद्मजा या रस्त्याचे रूंदीकरण पूर्ण झालेले आहे. मात्र, बसस्थानक ते मेहंदळे आश्रम या दापोली-हर्णै रस्त्यावरच्या झालेल्या रूंदीकरणात एक समस्या निर्माण झाली होती. निधीअभावी केळसकर नाक्याजवळ जोग नदीवरील दोन जुने पूल तसेच ठेवण्यात आले होते. ९ मीटरपेक्षा जास्त रूंद रस्ता व मध्येच ५ मीटरपेक्षा कमी रूंदीचे दोन पूल यामुळे मूळ रूंदीकरणाचाच हेतू अपूर्ण राहिला होता.
या अरूंंद पुलांमुळे रूंदीकरण करूनही काहीच फायदा होत नव्हता. उलट अशा पुलांमुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यातच हे दोन्ही अरूंद पूल जीर्ण झाले होते. आता या दोन पुलांमुळे होणारी गैरसोय लवकरच थांबणार आहे. या दोन पुलांसाठी प्रत्येकी ६० लाख रूपये असा १ कोटी २० लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाची निविदा प्रसिध्द होऊन याचा ठेका एका प्रतिष्ठीत कॉन्टॅ्रक्टरला देऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.
हे दोन पूल नव्याने बांधले नाहीत, तर रस्ता रूंदीकरण करूनही काहीच फायदा होणार नाही. उलट अपघातांचे प्रमाण वाढेल, असे मुद्दे माजी पालकमंत्री भास्कर जाधव दापोली नगरपंचायत निवडणूक होण्याआधी दापोलीत आले असता मांडले गेले. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या कामाकडे लक्ष देईन व निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले होते. त्यांनी पाळले आहे.
याबाबत करण्यात आलेला पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभाग, दापोलीचे उपअभियंता सुब्बुराज यांनी तातडीने दिलेली कागदपत्र व तांत्रिक बाजूंची पूर्तता यामुळे ही समस्या आता मार्गी लागली आहे.
दोन पूल नव्याने होणार असल्याने रस्ता रूंदीकरणानंतर विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही पुलांच्या उभारणीसाठी निधीची तरतूद झाल्याने परिसरातील बहुतांश लोकांची गैरसोय दूर होणार आहे. यापूर्वी अरूंद पुलामुळे रूंदीकरण होऊनही त्याचा फायदा वाहनाना होत नव्हता व गैरसोय होत होती. मात्र, आता ही गैरसोय दूर होणार आहे.
केळसकर नाक्याजवळ जोग नदीवरील दोन जुने पूल तसेच ठेवण्यात आले होते. हे दोन पूल तसेच राहिल्याने मूळ रूंदीकरणाचा हेतू अपूर्ण राहिला होता आता तो पूर्ण झाला आहे. (वार्ताहर)