लोटेतील कंपन्यांचे फलक झाले गायब
By Admin | Updated: November 6, 2014 22:07 IST2014-11-06T21:17:00+5:302014-11-06T22:07:29+5:30
धक्कादायक : कंपनी वेगळी; उत्पादन वेगळे

लोटेतील कंपन्यांचे फलक झाले गायब
आवाशी : औद्योगिक सुरक्षा दिनाच्या निमित्ताने खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत फेरफटका मारला असता अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच अनेक छोट्या कंपनीमध्ये उत्पादन सुरु असूनही त्यांचे नाव फलकावर दिसत नसल्याचे चित्र लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतून दिसून येत आहे.
रासायनिक वा तत्सम प्रकारचे उत्पादन घेणाऱ्या बहुतांश कंपन्या लोटे औद्योगिक वसाहतीत कार्यरत आहेत. कोणती कंपनी कोणत्या प्रकारचे उत्पादन करते, त्यांचा कच्चा माल कोणता? त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन घेण्यास दिलेली अनुमती, त्यांच्या रासायनिक प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा बीओडी व सीओडी किती आहे, या अन्य माहितीचा तक्ता त्या त्या कंपन्यांच्या प्रवेशद्वाराबाहेर लावणे बंधनकारक आहे. मात्र, इथल्या वसाहतीची पाहणी केली असता अशा कितीतरी कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर आवश्यक माहिती सोडाच खुद्द त्यांच्या नावाचा फलक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बाहेर कंपनीच्या नावाचा असलेला फलक व प्रत्यक्षात उत्पादन यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे नजरेस पडते. त्यामुळे नामफलकासह पर्यावरणाचा तक्ता, कच्चा मालाची माहिती, उत्पादित मालाचा दर्जा इत्यादी माहिती जाणूनबुजून लपवली जाते की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत सध्या सिक इंडस्ट्रीच्या नावाखाली कंपनी वेगळी आणि उत्पादन वेगळे असे प्रकार वाढीला लागले आहेत. याबाबतीतील सविस्तर माहिती दर्शनी फलकावर का लावली जात नाही, असा सवाल विचारला जात आहे. या भागात सुरूवातीला मोठ्या संख्येने असलेली युनिट्स बंद पडली असून, ही वसाहत मरणासन्न अवस्थेत आहे. मात्र, येथील उद्योजक आशावादी असून, उद्योगधंद्यांना उर्जितावस्था येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यासाठी कपनीने माहिती फलकावर लावणे बंधनकारक आहे. (वार्ताहर)
उत्पादनाची मााहिती लावणे बंधनकारक
लोटे औद्योगिक क्षेत्र रासायनिक क्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. कारखाने व त्यांना उद्भवणाऱ्या समस्या याबाबत उद्योग मंत्रालयाकडे चर्चा होते. येथे असलेल्या उद्योगातून कोणते उत्पादन घेतले जाते, याबाबत सविस्तर माहिती मिळावी, अशी मागणी त्या भागातील नागरिकांनी केली आहे. बंद पडलेले व सद्यस्थितीत सुरू असलेल्या उद्योगांची माहिती देणे आवश्यक आहे.
अनेक प्रकार उघडकीस येत असल्याचा दावा.
सुरक्षेची ऐशी तैसी कायमची.
रासायनिक कारखान्यांच्या उत्पादनांची माहिती फलकावर का नाही.
प्रवेशद्वारावर कंपन्या नाव लावणेही विसरल्यात.
फलक वेगळा प्रत्यक्षात उत्पादन वेगळेच.
माहितीचा तक्ता लावणे बंधनकारक.