Corona vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:44 IST2021-04-23T18:43:00+5:302021-04-23T18:44:33+5:30
Corona vaccine : रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागामध्ये लसीकरणासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर मिळणारा प्रतिसाद पाहता या केंद्रांवर होणारी गर्दी टाळावी तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच २६ एप्रिलपर्यंत कुठल्या केंद्रावर कुठली लस मिळणार आहे, याविषयी नियोजन करून त्या केंद्रांवर तशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Corona vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी नियोजन
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागामध्ये लसीकरणासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर मिळणारा प्रतिसाद पाहता या केंद्रांवर होणारी गर्दी टाळावी तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच २६ एप्रिलपर्यंत कुठल्या केंद्रावर कुठली लस मिळणार आहे, याविषयी नियोजन करून त्या केंद्रांवर तशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रत्नागिरो शहरात मिस्त्री हायस्कूल, नागरी आरोग्य केद्र, झाडगाव, नागरी आरोग्य केंद्र, कोकणनगर, पोलीस मुख्यालय दवाखाना तसेच नागरी आरोग्य केंद्र, चिपळूण व नगर परिषद दवाखाना, खेड अशा एकूण ६ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच आता विविध आस्थापना, शासकीय कार्यालये यांमधील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सक्तीचे करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांचीही गर्दी होत आहे.
काही वेळा केंद्रांवर लस नसल्याने किंवा मर्यादित साठा असल्याने अनेक नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करून लस न घेता मागे फिरावे लागते. त्यामुळे पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आता लसीकरण करणाऱ्यांना cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्यांचेच लसीकरण होणार आहे.
सध्या या नियोजनानुसार या सहा केंद्रांवर २६ एप्रिलपर्यंत कोणते डोस कुठल्या दिवशी दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक दिवशी किती डोस उपलब्ध आहेत, याबाबतची माहितीही २२ एप्रिलपासून फलकावर प्रसिद्ध केली जात आहे. पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय शहरी भागातील कोणत्याही लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
शहरी भागात ६ लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे २२ एप्रिलपासून नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉॅ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.
...असे आहे नियोजन
मिस्त्री हायस्कूल, झाडगाव, कोकणनगर, पोलीस मुख्यालय दवाखाना, नागरी आरोग्य केंद्र, चिपळूण व खेड नगर परिषद दवाखाना या सहाही केंद्रांवर २३ एप्रिल रोजी पहिला डोस देण्यात येणार आहे. २४ रोजी कोविशिल्ड या लसचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.