एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दिवाळीपूर्वी पूर्तता व्हावी, अन्यथा..; संघटनेने दिला इशारा
By मेहरून नाकाडे | Updated: October 18, 2023 14:37 IST2023-10-18T14:37:18+5:302023-10-18T14:37:48+5:30
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दिवाळीपूर्वी पूर्तता व्हावी, अन्यथा..; संघटनेने दिला इशारा
रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ दराच्या थकबाकीबाबत शासनाने दिवाळीपूर्वी निर्णय घेण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या संघटनेच्या बेमुदत उपोषण नोटीस अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शासन पातळीवर एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २४ टक्क़्यावरून ४२ टक्के महागाई भत्ता सप्टेंबरच्या देय आॅक्टोबरच्या वेतनापासून लागू करण्यात आला आहे.
महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले होते. परंतु अद्याप बैठक झालेली नाही. दिवाळीसारखा महत्वाचा सण दि. १० आॅक्टोबर पासून सुरू होत आहे. त्यामुळे वरील सर्व थकबाकीबाबत निर्णय होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना थकबाकी मिळणे आवश्यक आहे. तसेच संघटनेने मागणी केल्यानुसार सर्वच कामगारांना दिवाळी भेट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप साटम, कार्याध्यक्ष शेखर सावंत, विभागिय संघटनेचे अध्यक्ष राजेश मयेकर, सचिव रवि लवेकर, कार्याध्यक्ष शेखर सावंत, विभागिय अध्यक्ष अमित लांजेकर उपस्थित होते.