चिपळूण भटारखाना कारवाईकडे लक्ष

By Admin | Updated: September 19, 2014 00:09 IST2014-09-18T23:49:07+5:302014-09-19T00:09:35+5:30

बहादूरशेख नाका : अन्नभेसळच्या कारवाईने उडाली होती खळबळ

Pay attention to the activities of Chiplun Bhatarkhan | चिपळूण भटारखाना कारवाईकडे लक्ष

चिपळूण भटारखाना कारवाईकडे लक्ष

चिपळूण : शहरातील गजबजलेल्या बहादूरशेख नाका परिसरात असलेल्या एका बेकरीवर अन्नभेसळ नियंत्रण मंडळाने धाड टाकली होती. त्या दरम्यान या बेकरीसाठी असणारा भटारखाना बेकायदा असल्याचे निदर्शनास आले. संबंधित बेकरी मालकाला बांधकाम तोडून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाला ६ महिने झाले तरी कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
एप्रिल महिन्यात अन्नभेसळ नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील काही बेकरींची तपासणी केली. यामध्ये बहादूरशेख नाका येथे असणाऱ्या सुरभी बेकरीमध्ये तपासणीमध्ये तफावत आढळली. त्यामुळे संबंधित विभागाने या बेकरी मालकाला दंडही ठोठावला. हा दंड संबंधित मालकाने भरला आहे. मात्र, या बेकरीसाठी असणारा भटारखाना हा नगर परिषदेची परवानगी न घेता बांधण्यात आला असल्याचे पुढे आले आहे. संबंधित बेकरी मालकाला नगर परिषद प्रशासनातर्फे केवळ नोटीस दिल्या जात आहेत. मात्र, कार्यवाही होत नसल्याने मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी रविकांत काणेकर, राकेश घोरपडे, मुबीन गोठे, किशोर कदम, मुनाफ हमदुले आदी उपस्थित होते.
सहा महिन्यांपूर्वी बेकरीचा भटारखाना बेकायदा असल्याचे स्पष्ट होऊनही नगर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली नसल्याने हा भटारखाना राजरोसपणे सुरु आहे. याबाबत प्रशासनाची भूमिका काय, असा जाब या कार्यकर्त्यांनी विचारला. येत्या दोन दिवसात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी पाटील यांनी दिले आहे. असे असले तरी स्थानिकांवर अन्याय मात्र परप्रांतीयाना वरदहस्त असा प्रकार सुरु असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सध्या निवडणुका जाहीर झाल्या असल्याने आम्ही शांत आहोत. निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर संबंधित बेकरीच्या भटारखान्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना मनसे स्टाईलने धारेवर धरले जाईल, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Pay attention to the activities of Chiplun Bhatarkhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.