माळरानावर नंदनवन

By Admin | Updated: January 14, 2015 23:38 IST2015-01-14T20:44:42+5:302015-01-14T23:38:14+5:30

पन्नास एकरवर प्रयोग : अनिल जोशी ठरले कृषिक्रांतीचे दूत..

Paradise on the ocean | माळरानावर नंदनवन

माळरानावर नंदनवन

शोभना कांबळे - रत्नागिरी -रूग्णसेवा करतानाच व्यवसायाबरोबर भूमातेचीही सेवा करावी, या तळमळीतून गुहागर तालुक्यातील नरवण येथील डॉ. अनिल जोशी यांनी ५० एकरपेक्षा अधिक जमिनीवर आंबा, माड यांच्या लागवडीबरोबरच दालचिनी, मिरी, जायफळ आदी मसाल्याचीही लागवड करून, सुयोग्य पाण्याच्या नियोजनाबरोबरच परिश्रम करायची तयारी असेल तर ओसाड जमिनीवरही नंदनवन फुलविता येते, हे सिद्ध करून दाखविले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यात अतिशय दुर्गम आणि टोकाला असलेल्या नरवण गावात डॉ. अनिल जोशी गेली ३५ वर्षे अहर्निश रूग्णसेवा सेवा करीत आहेत. या माध्यमातून आसपासच्या सुमारे २० गावातील रूग्णसेवा करतानाच या गरीब लोकांसाठी काहीतरी करावे, ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना. यातून वैद्यकीय सेवा करतानाच त्यांनी पत्नी दीपा यांच्या सहकार्याने बागायती शेतीला प्रारंभ केला. नरवण व तवसाळसारख्या दुर्गम भागात शेती करणे आव्हानच होते. कारण सुरूंग लावून दगड फोडल्याशिवाय तिथे गवताचे पातेही उगवत नाही. मात्र, आधुनिक सुविधा वापरून शेती आणि बागायतीतून चरितार्थ चालू शकतो, हे परिसरातील शेकडो कुटुंबाला दाखवून द्यावे, हाच ध्यास घेऊन त्यांनी विविध प्रकारची बागायती शेती सुरू केली. यासाठी त्यांचे आई - वडील आणि ज्येष्ठ बंधूंची मदत झाली.
डॉ. जोशी यांनी मिळेल त्या मार्गाने पाणी आणले. खडक फोडून व डोंगर उतारावर आंब्याच्या बागा उभ्या केल्या. त्याच पाण्यावर एकाच खतावर गुलाबाची लागवड केली. काही प्रमाणात भाजीपालाही केला. एक वैद्यकीय व्यवसायाबरोबरच एक चांगला शेतकरी बनू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला. याचबरोबर परिसरातील शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध झालाच पण त्यांनाही स्वत:च्या फळबागा उभ्या करून स्वावलंबी केलं.
डॉ. जोशी यांनी हापूसच्या लागवडीवर न थांबता विविध प्रकारचे माड आणि सुपारीची लागवड केली. दालचिनी, जायफळ, मिरीचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यास सुरूवात केली. यासाठी स्वतंत्र विहीर खोदली. त्यातच मुलगा शंतनु वैद्यकीय व्यवसायात त्यांच्या मदतीसाठी पुढे आला. त्याची पत्नी शर्वरी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असल्याने, शेती बागायतीसाठी अधिक वेळ देणे शक्य झाले. धाकटा मुलगा विक्रम इंजिनिअर आहे. ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्राचा वापर करून पाण्याच्या सुयोग्य नियोजनातून अधिकाधिक उत्पादन घेणे शक्य झाले आहे. आता परिसरातील शेतकऱ्यांनाही यातून प्रेरणा मिळाली आहे.


दुर्गम भागातील यशोगाथा...
गुहागर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या नरवण, तवसाळ भागात डॉ. अनिल जोशी यांनी ५० एकर जमिनीवर उभारलेल्या या बागायतींची दखल घेऊन जळगाव येथील जैन इरिगेशन उद्योग समूहाच्या वतीने, सूक्ष्म सिंचनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्याला दोन लाख रूपयांचा पुरस्कार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या नावाने दिला जातो. डॉ. अनिल जोशी यांना सपत्निक गौरविण्यात आले. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार झाला.


डॉ. अनिल जोशी यांनी ५० एकरपेक्षा जास्त, तीही खडकाळ अशा जमिनीवर ४००० हापूसची झाडे लावली आहेत. बामणोली, प्रताप, टी. डी. आदी प्रकारची ५०० माडांची झाडे लावली आहेत. तसेच २०० पोफळीचीही झाडे लावली आहेत. या सगळ्यासाठी २५ फूट खोल विहीर खोदली आहे. त्याला पाणीही पुरेसे आहे. मात्र, या प्रत्येकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला जातो.

सुमारे २००० कलमांवर मिरीचीही रोपे लावली आहेत. यातून वर्षाला सुमारे ५०० किलो मिरीचे उत्पन्न मिळत आहे. त्याचबरोबर जायफळाची २०० झाडे लावण्याचा वेगळा प्रयोग त्यांनी याच दुर्गम भागातील खडकाळ जमिनीवर यशस्वी करून दाखवला आहे. दालचिनीचीही ५० झाडे आज उभी आहेत. प्रयोगशील बागायतदार म्हणून जोशी यांनी केलेले प्रयोग आदर्श ठरले आहेत.

Web Title: Paradise on the ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.