साठवणूक क्षमतेअभावी भातखरेदी थांबली
By Admin | Updated: May 23, 2015 00:36 IST2015-05-22T22:24:43+5:302015-05-23T00:36:40+5:30
लिलाव पध्दतीने भात विक्री : उंदिर, घुशींकडून भाताचे नुकसान

साठवणूक क्षमतेअभावी भातखरेदी थांबली
रत्नागिरी : गोदामांची साठवणूक क्षमता संपल्यामुळे यावर्षी भात खरेदी करण्यात आली नाही. २०१३-१४ मध्ये खरेदी करण्यात आलेले भात अद्याप तालुका संघाच्या गोदामात पडून आहे. उंदिर आणि घुशींकडून भाताचे नुकसान करण्यात आले आहे. मिलिंगमध्ये अखंड तांदूळ येण्याऐवजी तुकडा होणार आहे. शासनाचे यामध्ये नुकसान होणार असल्याने लिलाव पध्दतीने भात विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.
दि महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १६ खरेदी - विक्री केंद्रांवर १९५९ शेतकऱ्यांकडून २४ हजार ४९८.४६ क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती. शेतकऱ्यांकडून १३१० रूपये प्रतिक्विंटल अधिक दोनशे रूपये बोनस देऊन खरेदी करण्यात आलेला भात मिलिंग प्रक्रिया रखडल्यामुळे अद्याप तालुका संघांच्या गोदामांमध्ये पडून राहिला आहे. भाताला दोन वर्षे झाल्यामुळे भात भरडण्यास योग्य राहिले नाही. मिलिंगवेळी तुकडा पडण्याची शक्यता असून, यामध्ये शासनाचे नुकसान होणार आहे. जिल्हाभरात कुठेही भरडाईकरिता मिलिंग मिल नसल्यामुळे कोल्हापूर किंवा रायगड जिल्ह्यात पाठवावे लागते. मात्र, यावर्षी मिलिंगचा क्विंटलचा दर न ठरल्यामुळे भात पडून राहिले आहे. २०१३-१४चे भात शिल्लक राहिल्यामुळे २०१४-१५ मध्ये खरेदी झालेली नाही. भात पडून राहिल्यामुळे नवीन खरेदी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय नवीन हंगाम आता पुन्हा सुरू होत आहे. मे अखेरपर्यंत लिलाव पध्दतीने विक्री व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दि महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदी करण्यात आल्यानंतर संबंधित भात मिलिंग करून आलेला तांदूळ भारतीय अन्न महामंडळातर्फे तांदूळ खरेदी करण्यात येतो. मात्र, एफसीआयने तांदूळ खरेदीच बंद केली आहे. रेशन दुकानामध्ये विक्रीस ठेवण्यात येतो. परंतु दोन वर्षे भात गोदामातून पडून राहिल्यामुळे ते भात प्रोसेसिंगसाठी योग्य राहिलेले नाही. तांदळाचा योग्य दर्जा मिळाला नाही तर वाहतूक खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळेच भात गोदामाध्ये अद्याप पडून आहे. भाताचा उठाव न झाल्यामुळे लिलाव पध्दतीने विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.
एफसीआयने भाताची उचल न केल्यामुळे भात पडून राहिले आहे. जिल्ह्यातील आठ गोदामांतील भातासाठी ई निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, प्रतिसादाअभावी फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी प्रभाकर किल्ले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
साधारणत: नोव्हेंबरमध्ये भात कापणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर ते मार्चपर्यंत भात खरेदी करण्यात येते. २०१४-१५ साठी १३६० रूपये प्रतिक्विंटलला दर निश्चित करण्यात आला होता. शिवाय जिल्ह्याला २५००० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वीचे भात गोदामामध्ये पडून राहिले आणि गोदामाची साठवणूक क्षमता नसल्यामुळे तालुका खरेदी - विक्री संघाने भात खरेदी करण्यास नकार दिला. परिणामी भात खरेदीची प्रकिया थांबली. हंगामात पिकवलेले भात स्वत:पुरते ठेवून शेतकरी विकून काही पैसे मिळवतात. परंतु खरेदीची प्रक्रियाच थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर्षी भातपीक घ्यावे वा नाही, या विवंचनेत शेतकरीवर्ग पडलेला दिसून येत आहे.
मे महिनाअखेर लिलाव प्रक्रिया झाली तर भात खरेदी सुरू करण्यात येईल. एकीकडे शासन ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले दिसून येत आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातील पीक वाया गेले तरीही शासन अद्याप नुकसानभरपाई देण्याच्या मन:स्थितीत नाही. त्याचप्रमाणे भातही शेतकऱ्यांकडे अद्याप पडून राहिला आहे. विक्रीबाबात शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांपुढे आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताकडे शासन डोळेझाक करीत असलेले दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
भात खरेदी केंद्र शेतकरीभात
१खेड२७५४५३०
२दापोली१११९५३.६०
३केळशी१५३१०७७.०१
४गुहागर१९७१६५९.६०
५रत्नागिरी१२२११०५.६०
६संगमेश्वर१७२२५०७.६०
७लांजा१८१२८.४०
८राजापूर१२८१९९४.४०
भात खरेदी केंद्र शेतकरी भात
९पाचल९३११५६.८०
१०चिपळूण११८१९९४.४०
११निवळी३१५६०.४०
१२मिरवणे१२५२०२१.२०
१३आकले४१४४३.६०
१४शिरगाव१९०१७८०.४०
१५शिरळ११३१५०१.१०
१६देवरूख७२९०९.९५