बाजारपेठांना उड्डाणपूलाचा पर्याय
By Admin | Updated: August 24, 2014 00:37 IST2014-08-24T00:37:51+5:302014-08-24T00:37:51+5:30
टोलमुक्त महामार्गाची मागणी मान्य : विनायक राऊत

बाजारपेठांना उड्डाणपूलाचा पर्याय
रत्नागिरी : महामार्ग चौपदीकरणाच्या कामामुळे बाजारपेठा उध्वस्त होऊ नयेत, यासाठी सहा बाजारपेठांच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत़ महामार्गाचे काँक्रिटीकरण आणि टोलमुक्त या दोन्ही मागण्या केंद्र शासनाने मान्य केल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
यावेळी माजी आमदार बाळ माने, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, भाजपा जिल्हाप्रमुख सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर उपस्थित होत्या. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते महामार्गाचे निवळी येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाच्या कामाचा आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ रविवारी होणार आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, चौपदरीकरणाच्या प्रकल्पामध्ये लोकांचा सहभाग आणि कमीत कमी विस्थापन, अशी भूमिका समोर ठेवूनच हे काम सुरु करण्यात येत आहे.
ते पुढे म्हणाले की, महामार्गाचे चौपदरीकरणासाठी मागील वर्षी झालेल्या सर्वेक्षणाप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नव्हते़ चौपदरीकरणामध्ये रोहा, चिपळूण, लांजा, पाली, कणकवली, संगमेश्वर या बाजारपेठा उध्वस्त होऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करतानाच राऊत यांनी पाली, लांजा कणकवली या बाजारपेठांच्या ठिकाणी उड्डाणपूलासाठी तरतूद करा, अशी मागणी केली होती़ ती मान्य झाली असून आणखी चिपळूण, राजापूर, तळेरे या बाजारपेठेतही उड्डाणपूलाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़
ते पुढे म्हणाले की, खेड, कणकवली, कुडाळ येथे महामार्गाच्या चौपदरीकणासाठी भूसंपादनाचे काम सुरु केले आहे़ त्यामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांचे योगदान घेण्यात येत असून त्यासाठी वेगळे मानधनाची तरतूद करण्यात आली आहे़
इंदापूर ते झाराप रस्त्याच्या चौपदरीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम संथगतीने सुरु आहे़ कारण येथील भूसंपादनाची कार्यवाही व्यवस्थित झालेली नसल्याची खंतही व्यक्त करतानाच त्याप्रमाणे चुका होऊ नये, यासाठी यावेळी दक्षता घेण्यात आली असल्याचेही खा़ राऊत यांनी स्पष्ट केले़
चौपदरीकरणाचे काम पाच टप्प्यांमध्ये करण्यात येणार होते़ मात्र, आता ते आठ टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून हे काम २०१७ सालापर्यंत पूर्ण होणार असल्याचे राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले़ (शहर वार्ताहर)