स्वतंत्र मंडणगड जिल्हा होण्याचा मार्ग मोकळा? - सरकारच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:51 PM2020-01-30T12:51:52+5:302020-01-30T12:53:34+5:30

रत्नागिरी : चिपळूण ते माणगाव स्वतंत्र जिल्हा व्हावा व त्याचे मुख्यालय मंडणगड किंवा दापोली या ठिकाणी व्हावे, या मागणीच्या ...

 Open the way to become an independent Mandangad district? | स्वतंत्र मंडणगड जिल्हा होण्याचा मार्ग मोकळा? - सरकारच्या हालचाली

स्वतंत्र मंडणगड जिल्हा होण्याचा मार्ग मोकळा? - सरकारच्या हालचाली

Next
ठळक मुद्दे - जिल्हा विभाजनातील अडथळा दूर

रत्नागिरी : चिपळूण ते माणगाव स्वतंत्र जिल्हा व्हावा व त्याचे मुख्यालय मंडणगड किंवा दापोली या ठिकाणी व्हावे, या मागणीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीला सन २०१४मध्ये प्रारंभ झाला होता. त्यानंतर ही कार्यवाही पूर्णपणे थंडावली होती. मात्र, आता राज्य शासनाने राज्यातील २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे संकेत दिल्याने आता रत्नागिरी जिल्हा विभाजनाच्या कार्यवाहीला गती मिळणार आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेडचा काही भाग रायगड जिल्ह्यात समाविष्ट करण्याचे विचाराधीन असून, नवीन जिल्ह्याचे ठिकाण मंडणगड किंवा महाड (जि. रायगड)चा विचार केला जाणार असल्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा प्रारंभ मंडणगड तालुक्यापासून होतो. संगमेश्वर आणि मंडणगड या तालुक्यांचा समावेश ग्रामीण क्षेत्रात होतो. त्यापैकी मंडणगड तालुका दुर्गम असल्याने या तालुक्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचा विकास थांबला आहे. रत्नागिरी ते मंडणगड हे अंतर सुमारे १७० किलोमीटर इतके आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी पाच ते सहा तास वाहनाचा प्रवास करावा लागतो.

या तालुक्यातील ग्रामीण जनतेला तर शासकीय कामांसाठी येताना न पेलवणारा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तसेच शासकीय कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर ते काम करून परत जाण्यासाठी पूर्ण दिवस घालवावा लागतो. त्यामुळे या तालुक्याच्या समस्यांचा विचार करून हा तालुका रायगड जिल्ह्याला जोडण्याचा निर्णयही मध्यंतरी विचाराधीन होता.

या सर्व बाबींचा विचार करून २७ मे २०१४ रोजी झालेल्या मंडणगडच्या पंचायत समितीच्या बैठकीत चिपळूण ते माणगाव (जि. रायगड) असा स्वतंत्र जिल्हा व्हावा व त्याचे मुख्यालय मंडणगड या ठिकाणी व्हावे, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. जिल्हा विभाजन झाले तर चिपळूणसह खेड, दापोली, मंडणगड या तालुक्यांना मध्यवर्ती जिल्ह्याचे ठिकाण दापोली किंवा मंडणगड ठरेल, असेही या ठरावात नमूद करण्यात आले होते. या ठरावाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून, दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्याकडून लोकसंख्या, उद्योग, कृषी क्षेत्र, शैक्षणिक सुविधा आदींची माहिती मागविण्यात आली होती.

त्यादृष्टीने काही काळ कार्यवाही सुरू करण्यात आली होती. कार्यवाही सुरू होऊन पाच वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप याबाबत जिल्हा प्रशासनाकडे काहीच माहितीच आलेली नाही. याविषयी जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी सातत्याने स्मरणपत्राद्वारे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अजूनही ही माहिती जिल्हा प्रशासनाला मिळालेली नाही.

आता राज्य सरकारने राज्यातील २२ नव्या जिल्ह्यांच्या आणि ४९ नव्या तालुक्यांच्या निर्मितीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मंडणगड हा स्वतंत्र जिल्ह्याचे विभाजन करून त्याला दापोली, खेड, हे तालुके जोडून तसेच रायगड जिल्ह्यातील काही तालुके जोडून नवीन जिल्हा अस्तित्त्वात येण्याची शक्यता आहे.

सहा वर्षांपूर्वीचा प्रस्ताव
२०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्य सचिवांच्या नेतृत्त्वाखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २२ नव्या जिल्ह्यांची आणि ४९ नव्या तालुक्यांची निर्मिती करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यात मंडणगडचा समावेश आहे. मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजनचा प्रस्तावही या समितीने ठेवला होता. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केल्याने मंडणगडसह रायगडमधील काही तालुके मिळून महाड स्वतंत्र जिल्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Open the way to become an independent Mandangad district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.