फक्त एकच अहवाल रत्नागिरी करू शकतोय कोरोनामुक्त... काय असेल याच प्रतिक्षेत सारे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:01 IST2020-04-28T12:58:04+5:302020-04-28T13:01:20+5:30
देश व जिल्ह्याबाहेरून येणा-या प्रत्येकाला क्वॉरंटाईन करण्यात आले. कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या भागात काटेकोरपणे आरोग्य तपासणी करण्यात आली.

फक्त एकच अहवाल रत्नागिरी करू शकतोय कोरोनामुक्त... काय असेल याच प्रतिक्षेत सारे...
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या १३ अहवालांपैकी १२ अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेले १२ च्या १२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केवळ एका संशयिताचा अहवाल येणे बाकी असून, जिल्ह्याची शंभर टक्के कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या तपासणी नमुन्यांपैकी १२ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार १३ अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी १२ अहवाल मंगळवारी आले आहेत. जिल्ह्यात यापूर्वी ६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. यापैकी ५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने कडक पाऊले उचलून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले. देश व जिल्ह्याबाहेरून येणा-या प्रत्येकाला क्वॉरंटाईन करण्यात आले. कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या भागात काटेकोरपणे आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या एकत्रितपणे कामामुळे जिल्ह्यात कोरोनाविरूद्धचा लढा यशस्वी झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नसला तरी नागरिकांनी अजूनही निष्काळजीपणे राहू नये. कोरोनाचे संकट पूर्णत: दूर झालेले नसून नागरिकांनी घरीच राहून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडून गर्दी करू नये, असेही आवाहन केले आहे.