भंडारपुळे समुद्रात मासे पकडताना एक बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 22:25 IST2024-08-27T22:25:17+5:302024-08-27T22:25:25+5:30
नारळी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मधेमधे मोठी सर येत असली तरी पाऊस सरीवरच असल्याने मासेमारी नव्या जोमाने सुरू झाली आहे.

भंडारपुळे समुद्रात मासे पकडताना एक बुडाला
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळेनजीकच्या भंडारपुळे भागात मासे पकडण्यासाठी गेलेला एक प्रौढ समुद्रात एकजण बुडाला आहे. नौशिन नजीर पेवेकर (३८, रा. मजगाव, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.
नारळी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मधेमधे मोठी सर येत असली तरी पाऊस सरीवरच असल्याने मासेमारी नव्या जोमाने सुरू झाली आहे. मंगळवारी सायंकाळी मजगाव येथील तीनचारजण मासे पकडण्यासाठी म्हणून भंडारपुळे येथे गेले होते. तेथे मासा पकडण्याच्या नादात नौशिन पेवेकर तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही आणि त्यात नौशिन बुडाले.
या घटनेची माहिती तातडीने आसपासच्या लोकांना तसेच नातेवाईकांना देण्यात आली. त्यामुळे असंख्य लोक तेथे गोळा झाले. त्यांनी तातडीने समुद्रात शोधाशोध सुरू केली. घटना घडल्यानंतर सुमारे दोन तासांनी म्हणजेच पावणेदहा वाजण्याच्या सुमारास नौशिन यांचा शोध लागला. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेबद्दल तातडीने पोलिसांनाही माहिती देण्यात आली. तेही लगेचच घटनास्थळी हजर झाले.