चिपळुणातील पाणीटंचाई आराखड्यासाठी एक कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:19+5:302021-05-05T04:51:19+5:30

चिपळूण : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तालुक्याचा टंचाई आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या आराखड्याअंतर्गत ...

One crore sanctioned for water scarcity plan in Chiplun | चिपळुणातील पाणीटंचाई आराखड्यासाठी एक कोटी मंजूर

चिपळुणातील पाणीटंचाई आराखड्यासाठी एक कोटी मंजूर

चिपळूण : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तालुक्याचा टंचाई आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या आराखड्याअंतर्गत तालुक्यातील १९ गावांच्या नळ पाणी योजनांची दुरुस्ती तर एका गावच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी १ कोटी ३ लाख ५२ हजार २९३ रुपये खर्च केला जाणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर तत्काळ या कामांना सुरुवात केली जाणार असल्याने ग्रामस्थांची तहाण भागविणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळणार आहे.

तालुक्यात दरवर्षी मार्चनंतर पाणीटंचाईला सुरुवात होते. पाणी योजनेवर कोट्यवधींचा निधी खर्च झाला तरी तालुक्यातील पाणीटंचाई नित्याचीच ठरली आहे. पाणीटंचाईची समस्या असलेल्या गावांचा अभ्यास करून तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यात ५३ गावे व ९६ वाड्यांचा समावेश होता. हा आराखडा जिल्हा परिषदतर्फे कोकण आयुक्तांकडे गेल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली होती. त्यापैकी चिपळूण तालुक्यातील २० गावांतील पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३ लाख ५२ हजार २९३ रुपयांचा निधी मंजूर झाला. यामध्ये एका गावात तात्पुरती पूरक योजना राबविण्यात येणार आहे.

पाणी योजनांच्या दुरुस्तीमध्ये उभळे आगरगाव, गोसावीवाडी, कापसाळ येथील खोरकरवाडी, पोफळी सय्यदवाडी, धामणवणे दत्तवाडी, शिरळ मोरेवाडी, रेहेळवैजी पवारवाडी, तिवरे येथील कुंभारवाडी पुनर्वसन, तिवडी मधलीवाडी, कळवंडे, बामणेवाडी, तावडेवाडी, निर्व्हाळ वाघेवाडी, डुगवे बौद्धवाडी, भोम खालचीवाडी कालुस्ते कुपेवाडी, कादवड धनगरवाडी, पोसरे आदावडेवाडी या गावांचा समावेश आहे.

..........................................

शिरगाव-धनगरवाडीत तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा याेजना

शिरगाव येथील धनगरवाडीमध्ये तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. योजनांची कामे मार्गी लागण्यासाठी निविदाप्रक्रिया राबवली जात आहे. निविदाप्रक्रिया झाल्यानंतर पाणी योजनांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. या गावांमधील पाणी योजना जीर्ण झाल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र योजनेच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीकडून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र आता २० गावांतील पाणी योजनांच्या दुरुस्तीकरिता निधी मिळाल्याने त्या-त्या गावांतील पाणी योजना नियमित सुरू राहण्यास मदत होणार आहे.

Web Title: One crore sanctioned for water scarcity plan in Chiplun