रत्नागिरी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपारत्नागिरी (दक्षिण)तर्फे रविवारी भाट्ये किनाऱ्यावर अटलबिहारी वाजपेयी यांचे वाळूशिल्प साकारण्यात आले हाेते. या वाळू शिल्पाचे उद्घाटन आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे यावर्षी जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने वाजपेयी यांचे रत्नागिरीत स्मारक व्हावे, अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे. वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाट्ये किनाऱ्यावर वाळूशिल्प साकारण्यात आले आहे. रत्नागिरीतील कलाकार अमित पेडणेकर यांनी पाच तासांत हे वाळूशिल्प साकारले आहे.यावेळी कलाकार पेडणेकर यांचा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, शिल्पा मराठे, रत्नागिरी शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, सुशांत पाटकर, उमेश देसाई, नीलेश आखाडे उपस्थित होते.
पीपीटी शोमाजी पंतप्रधान अटलबिहारी यांच्या जीवनपट, त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा खास पीपीटी शो रविवारी आयोजित करण्यात आला होता. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाळूशिल्पासह पीपीटी शो पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.