शिबिरातही जुन्या-नव्यांचा वाद
By Admin | Updated: October 5, 2015 00:17 IST2015-10-04T21:49:50+5:302015-10-05T00:17:15+5:30
रत्नागिरी : शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे महाआरोग्य शिबिराचा फज्जा...

शिबिरातही जुन्या-नव्यांचा वाद
प्रकाश वराडकर- रत्नागिरी --दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यांंसाठी कुवारबाव - रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात किती रुग्णांची तपासणी झाली, हा विषय संशोधनाचा ठरला आहे. संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यांमधील असंख्य रुग्णांना तपासणी न करताच अन्न-पाण्याशिवाय परतीचा मार्ग धरावा लागल्याने शिवसेनेतच तीव्र पडसाद उमटले आहेत. ढिसाळ नियोजनाच्या वादातून नवीन व जुन्यांमधील वाद चिघळला आहे. जुन्या - नव्यांच्या डंखामुळे आरोग्य शिबिरही घायाळ झाले. नियोजनाअभावी या शिबिराचा फज्जा उडाला असून, त्यामुळे सेनेंतर्गत जुन्या - नव्यांमधील वादात आणखीच तेल ओतले गेले आहे. हे शिबिर आयोजित करताना सेनेतील स्थानिकांना विश्वासातच घेतले गेलेले नाही, असा आरोप केला जात आहे.
रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यांसाठी रत्नागिरीतील कुवारबाव येथे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने शनिवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील शिबिराची जबाबदारी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, त्यासाठी आवश्यक स्वयंसेवक नियुक्ती, जबाबदारीचे वाटप, शिबिरस्थळी आवश्यक असलेली व्यवस्था याचे योग्य नियोजनच झाले नसल्याने शिबिराचा फज्जा उडाला.
पालकमंत्री वायकर व रत्नागिरीतील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात गेल्या वर्षभरापासून शीतयुध्द सुरू आहे. विधानसभेच्या तोंडावरच जुन्यांच्या बंडामुळे अनेकांच्या तोंडाला फेस आला होता. मात्र, शक्तिशाली फवारणी करीत हे वादळ त्यावेळी शमविण्यात आले होते.
रत्नागिरी व संगमेश्वरमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्या - कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर जुना - नवा वाद निर्माण झाला असून, ही दरी आता वाढतच चालली आहे. रत्नागिरीत चार तालुक्यांसाठी सेनेतर्फे महाआरोग्य शिबिर आयोजनाचा निर्णय पालकमंत्री वायकर यांनी घेऊन एक चांगले पाऊल उचलले. त्याची पूर्ण जबाबदारी जिल्हाप्रमुख महाडिक यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र, हे शिबिर यशस्वी करण्यात त्यांचे नियोजन ढिसाळ ठरले की, त्यांचा जिल्हाप्रमुख म्हणून वचक कमी झाला, याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. हे शिबिर ढिसाळ नियोजनामुळे अयशस्वी झाले, जिल्हाप्रमुखांचा धाक कमी झाला की, शिबिर यशस्वी होऊ नये म्हणून कोणी खास प्रयत्न केले, याची चर्चा सेनेतच आहे.
जिल्ह्यात शिवसेना संघटनेची बांधणी गेल्या काही वर्षात चांगल्या प्रकारे झालेली असताना रत्नागिरीतील आरोग्य शिबिर यशस्वी न होण्यामागील कारणे शिवसेनेच्या नेत्यांना शोधावी लागणार आहेत. ४ तालुक्यातील गरजूंना बोलावून त्यांची कोणतीही तपासणी झाली नाहीच, परंतु त्यांना साधा नाष्टा व पाणीही मिळाले नाही. सेनेच्या प्रतिमेला त्यामुळे धक्का पोहोचला आहे.
शिबिरार्थी परतले अन्न-पाण्याविना.
1 रत्नागिरीतील आरोग्य शिबिरात तपासणी न होता असंख्य लोकांना परत जावे लागल्याने शिवसैनिकांतच नेत्यांबाबत असंतोष.
2जिल्हाप्रमुखांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नसल्यानेच आरोग्य शिबिराचा बोजवारा.
3पालकमंत्र्यांशी पंगा असलेल्यांनीही शिबिराच्या यशस्वीतेकडे लक्ष न दिल्याची चर्चा.
4उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार असल्याच्याही प्रतिक्रिया.
फलकप्रकरणीही
जुना-नवा वादच!
रत्नागिरीत गणेश उत्सवादरम्यान शिवसेनेतील फलकवाद उफाळून आला होता. शहभरभर लागलेल्या फलकांमध्ये आमदार राजन साळवी यांचा एकही फलक नव्हता. त्यानंतर शहरातील जयस्तंभ येथील काही फलकावर उदय सामंत यांचा फोटो नव्हता. यावरूनही रत्नागिरीत जुना - नवा वाद विकोपाला गेल्याचे समोर आले होते.