जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दोन वर्षांत लक्षणीय घट

By Admin | Updated: March 24, 2015 00:13 IST2015-03-23T23:33:02+5:302015-03-24T00:13:08+5:30

--जागतिक क्षयरोग दिन

The number of tuberculosis patients in the district has declined significantly in two years | जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दोन वर्षांत लक्षणीय घट

जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दोन वर्षांत लक्षणीय घट

रत्नागिरी : हवेमार्फत प्रसार होणाऱ्या क्षयरोगाकडे दुर्लक्ष केल्यास तो रुग्णाला मृत्युच्या दाढेत ओढतोच, शिवाय इतरांनाही त्याचा संसर्ग होतो. हा रोग बरा होणारा असला तरी जिल्ह्यात वर्षभरात त्याचे २२४२ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, २०१३पेक्षा सन २०१४ वर्षात रुग्णांची संख्या कमी आहे. गेल्या काही दिवसात क्षयरोगाने जिल्ह्यातून ‘एक्झिट’ घेण्याची तयारी चालवली आहे. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ रोजी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावला. त्यामुळे क्षयरोगावर उपचार करणे शक्य झाले. त्याची आठवण म्हणून २४ मार्च १९९३ पासून जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण जगभर २४ मार्च हा राष्ट्रीय जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येत आहे.क्षयरोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. क्षयरोग झालेली व्यक्ती औषधे घेत नसेल तर खोकल्यातून, शिंकेतून अथवा थुंकीतून क्षयाचे जीवाणू ती इतर लोकांमध्ये पसरविते. शरीरातील कोणत्याही अवयवास क्षयरोग होऊ शकतो. इतर अवयवांच्या तुलनेत फुफ्फुसाला क्षयरोग होण्याचे प्रमाण सर्वात अधिक आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, कामथे, दापोली, चिखली, देवरुख, कळंबणी आणि लांजा अशा ८ ठिकाणी क्षयरोग नियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्र, ३ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये, ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ आरोग्य उपकेंद्र, २ नगर परिषद दवाखाने ही सर्व रुग्णालये डॉट्स उपचार केंद्र म्हणून आरोग्य विभागाकडून घोषित करण्यात आली आहेत. या डॉट्स उपचार केंद्रामार्फत प्रत्येक गावात डॉट्स प्रोव्हायडर नेमून त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली आठवड्यातून तीन वेळा डॉट्स औषधोपचार मोफत देण्यात येतो. क्षयरोगावरील औषधे महागडी आहेत. रुग्णाने खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यास त्याला ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे बहुतांश रुग्ण या रोगावर शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. जिल्ह्यात सन २०१३मध्ये २४११ क्षयरोग रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी उपचाराखाली १२१८ रुग्ण असून, ९३१ रुग्ण औषधोपचारानंतर पूर्ण बरे झाले होते, तर ६२ रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला होता. सन २०१४ साली आढळलेल्या २२४२ क्षयरोगाच्या रुग्णांपैकी १२२८ रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, ९७५ बरे झाले आहेत. या रोगाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ५० आहे. मात्र, या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. नियमित औषधोपचार न घेणाऱ्या, व्यसनाधिनता आणि शेवटच्या क्षणी औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, क्षयरोगावर वेळीच औषधोपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)

Web Title: The number of tuberculosis patients in the district has declined significantly in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.